Suspicious Boat Near Mumbai : मुंबईच्या जवळ संशयास्पद बोट आढळली. मुंबई समुद्र किनाऱ्यापासून 42 नोटिकल्स मैल अंतरावर संशयास्पद मासेमारी नौका आढळली आहे. बोटीचं नाव जलराणी असल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे नौकेत दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सागरी पोलीस ठाण्यांना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आलेत.
मुंबई अरेबियन कोस्ट किनार्याजवळ आज एक संशयास्पद बोट दिसली. नौदल आणि तटरक्षक दलाचे अधिकारी या बोटीचा शोध घेत आहेत. आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अरबी समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सावध करण्यात आले आहे. बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाकडून बोटीची तपासणी सुरु आहे.
मुंबई पोलीस बंदर क्षेत्राला सकाळी 10 वाजता याची माहिती देण्यात आली. ही बोट नौदलाच्या हद्दीत 90 सागरी मैल अंतरावर सापडली आहे. त्यामुळे नौदल कारवाई करण्यात येणार आहे. जॉइंट ऑपरेशन सेंटरने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना माहिती दिली होती. सूत्रांनी सांगितले की बोट रोखण्यात आली असून त्यात पाकिस्तानी आढळले आहेत. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही दिली आहे.
दरम्यान, याआधी मुंबईच्या समुद्रात एक बोट संशयास्पदरित्या फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. 2023 या नव वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले असतानाच एक बोट संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती समोर आली. त्यावेळी मुंबईतील यलोगेट, सागरी 1 आणि सागरी 2 पोलीस ठाण्यांसह नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, पालघर, रायगड पोलिसांना आणि कोस्टल सिक्युरिटी अलर्ट जारी करण्यात आला होता. 30 डिसेंबरच्या सायंकाळच्या सुमारास कोस्टल डिफेन्स हेडक्वॉर्टर्सचे (सीडीएचक्यु) डेप्युटी लेफ्टनंट मॅथ्यू यांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल करुन नेव्हीनगर मेस आणि शिवमंदिर यामध्ये एक संशयित बोट फिरत असल्याची माहिती दिली होती. तिचा शोध घेतला असता अंधार झाल्यानंतर तिचा शोध लागला नाही. आता पुन्हा संशयित बोट सापडल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे.