मुंबई : स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका स्टॅण्डअप शोदरम्यान जोशुआने शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
अग्रिमा जोशुआच्या वदग्रस्त वक्तव्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दात टीका करत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित स्टुडिओची तोडफोड केली आहे. जोशुआच्या या व्हिडीओवरून सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्या मुलीने ज्या स्टुडिओत अपशब्द वापरले, तो स्टुडिओच मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी फोडला!' असं कॅप्शन देखील दिलं आहे.
मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर अग्रिमा जोशुआने लिखित स्वरूपात माफीनामा देखील सादर केला आहे.