मुंबई : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडर भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आलीय. सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात हा बंद पाळण्यात येणार आहे. कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करत आहेत.
काहीवेळापूर्वीच मुंबई कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली अंधेरीत कॉंग्रेसने रेलरोको करण्याचा प्रयत्न केला. सत्तेत असून सरकारला नेहमी धारेवर धरणारी शिवसेना या 'भारत बंद'मध्ये सहभागी होत नाही.
याबद्दल शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून खुलासा करण्यात आलायं. शिवसेनेने सत्तेत राहून विरोधकांची भूमिका नेहमी बजावली आता खरे विरोधक काय करताहेत ते पाहायचंय असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 'आम्हाला महागाईत होरपळणार्या जनतेविषयी सहानुभूती आहे. आम्ही जनतेची बाजू नेहमीच मांडली. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले पण आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची असल्याचे सामनात म्हटले आहे. जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये अशा कानपिचक्याही सामनातून विरोधी पक्षांना देण्यात आल्या आहेत.
आपला विकास दर कसा वाढला याचे फलक सरकारतर्फे लावण्यात येतात. याचप्रमाणे इंधन दरवाढीचे फलकही लावा असे आव्हान सेनेतर्फे देण्यात आले आहे. सरकारला शेतकर्यांचे संकट दूर करता आले नाही. देशात दोन कोटी नोकर्या दरवर्षी तरुणांना मिळतील असे पंतप्रधानांचे आश्वासन असताना प्रतिवर्षी 20 लाख नोकर्या कमी झाले असून तरुणांना काम नाही, गृहिणींना स्वयंपाकाचा गॅस नसल्याचे सेनेतर्फे सांगण्यात आले आहे.