'कॉमेडी करणं हा माझा....', युट्यूबर रणवीर अलाहबादियाने 'त्या' वादग्रस्त विधानावर सोडलं मौन, 'सर्व वयोगटातील लोक...'

Ranveer Allahbadia Apology: युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया याच्या एका विधानावरुन गदारोळ माजला आहे. यानंतर अखेर त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. रणवीर 'बिअर बायसेप्स' चॅनेलमुळे प्रचंड लोकप्रिय आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 10, 2025, 03:39 PM IST
'कॉमेडी करणं हा माझा....', युट्यूबर रणवीर अलाहबादियाने 'त्या' वादग्रस्त विधानावर सोडलं मौन, 'सर्व वयोगटातील लोक...' title=

Ranveer Allahbadia Apology: युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया याच्या एका विधानावरुन गदारोळ माजला आहे. Indias Got Latent शोमध्ये रणवीर अलाहबादियाने केलल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर भाष्य केलं असून, कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. यादरम्यान रणवीर अलाहबादियाने एक्सवर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. कॉमेडी हे माझं क्षेत्र नाही, ते अजिबात चांगलं नव्हतं असं त्याने मान्य केलं आहे. 

31 वर्षीय रणवीर अलाहबादियाने एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने कॅप्शन दिली आहे की, "इंडियाज गॉट लॅटंटमध्ये मी जे काही म्हणलं तो बोलायला नको होतं. मी माफी मागतो".

व्हिडीओमध्ये रणवीर अलाहबादिया सांगत आहे की, "माझी टिप्पणी अजिबात योग्य नव्हती. ती मजेशीरही नव्हती. विनोद हा माझा पिंड नाही, मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे".

रणवीर अलाहबादियावर टीका करताना अनेकांनी त्याला अशाप्रकारे या प्लॅटफॉर्मचा वापर करणं योग्य आहे का? अशी विचारणा केली आहे. त्यावर भाष्य करताना तो म्हणाला की, "अर्थातच मी या प्लॅटफॉर्मचा वापर अशा प्रकारे करू इच्छित नाही. जे काही घडले त्यामागे मी कोणताही संदर्भ, औचित्य किंवा तर्क देणार नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. वैयक्तिकरित्या माझा निर्णय घेण्यात चूक झाली. माझ्याकडून ते कूल नव्हतं". 

 
"हा पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात, मी अशी व्यक्ती बनू इच्छित नाही जी ती जबाबदारी गांभीर्याने घेणार नाही. मी कधीही कुटुंबाचा अनादर करणार नाही," अशीही बाजू त्याने मांडली आहे. 

नेमका वाद कशावरुन?

इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं की, "तुम्ही आयुष्यभर तुमच्या पालकांना दररोज सेक्स करताना पाहाल की एकदा सामील होऊन ते कायमचे थांबवाल?". हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर नेटकऱ्यांनी अलाहबादियावर टीका केली. त्याच्याविरुद्ध अनेक पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्याचे इंस्टाग्रामवर 4.5 दशलक्ष फॉलोअर्स आणि 1.5 कोटी युट्यूब सबस्क्रायबर्स आहेत.

...तर कारवाई होणार: देवेंद्र फडणवीस

मुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की," मला याची माहिती मिळाली आहे. मी अजून प्रत्यक्षात तो व्हिडीओ पाहिलेला नाही. फार घाणेरड्या पद्धतीने काही गोष्टी बोलल्या, सादर केल्या गेल्याचं मला कळलं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे," असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना फडणवीसांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी त्याने इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

"सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेव्हा संपतं जेव्हा आपल्या या स्वातंत्र्यामुळे इतराच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतं. अशाप्रकारचं अतिक्रमण करणं योग्य नाही. अभिव्यक्तीचीही काही मर्यादा आहे. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचेही काही नियम तयार केले आहेत. या नियमांचं कोणी उल्लंघन करत असेल तर ही फार चुकीची गोष्ट आहे. असं काही घडलं असेल तर त्याच्याविरोधात कारवाई व्हायला हवी," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.