संदीप देशपांडेंनी सांगितला मंत्रालयाचा नवीन पत्ता

समस्या अनेक उपाय एक...   

Updated: Nov 16, 2020, 02:41 PM IST
संदीप देशपांडेंनी सांगितला मंत्रालयाचा नवीन पत्ता

मुंबई : कोरोना व्हायरसच्या Coronavirus पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं या विषाणूचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात शासनाला यश मिळालं. पण, अनेक व्वसाय, लहान- मोठे उद्योग मात्र ठप्प झाल्यामुळं परिस्थिती पुरती बदलली. अनेकांना उदरनिर्वाह नेमका करायचा तरी कसा, हाच प्रश्न सतावू लागला. 

चार, सहा, आठ महिने होत आले असतानाही काही उद्योगांवरील टाळेबंदी मात्र कायमच राहिल्याचं पाहायला मिळालं. सरतेशेवटी मग अनेकांनीच मदतीसाठी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 

मनसे अध्यक्षांच्या निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेत आपल्या समस्या या मंडळींनी शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ग्रंथालय कर्मचारी, जिम ट्रेनर, मुंबईचे डबेवाले, कोळी महिला आणि कैक जणांनी राज ठाकरेंची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यापुढं मांडल्या. 

मुख्य म्हणजे कोरोना काळातही राज ठाकरे यांचं भेटीगाठींचं हे सत्र सुरुच राहिलं. परिणामी एकिकडे राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीचं काम सुरु असताना दुसरीकडे चर्चा मात्र राज ठाकरेंचीच होत राहिली. याच पार्श्वभूमीवर सरकारच्या वाट्याला आलेलं अपयश अधोरेखित करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला. त्यांनी थेट राज्यशासनाचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयाचा पत्ताच बदलला. 'समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28', असं ट्विट त्यांनी केलं. 

 

देशपांडे यांनी हे ट्विट केल्यानंतर त्यावरही अनेकांनी व्यक्त होत आपली प्रतिक्रिया दिली. मुख्य म्हणजे थेट मंत्रालयाचं स्थळच बदलल्याचं भासवणाऱ्या देशपांडे यांना आता महाविकासआघाडी सरकारमधून कोण उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.