Maharashtra Assembly Election: 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बसच्या जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी बेस्ट उपक्रमाला मतदानाच्या दिवशी जागा फेऱ्या चालवण्याचे निर्देश दिले आहेत.
20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजल्यापासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे. दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी लो फ्लोअर डेक बसही उपलब्ध असणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना वेळेत कर्तव्यावर पोहोचता यावे यासाठी जादा बस चालवण्यात येणार आहेत. या बस फेऱ्यांचे नियोजन सोमवारपर्यंत केले जाणार आहे, अशी माहिती बेस्टच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.
ज्येष्ठ मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत पोहोचता यावे यासाठी बेस्टची बससेवा उपलब्ध असणार आहे. तसंच ही सेवा मुंबई शहरांसह दोव्ही उपनगरांत उपलब्ध असणार आहे. मतदारांनी मतदान करावं, असं अवाहनदेखील करण्यात येत आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेनेदेखील लोकल सेवा उशिरापर्यंत धावणार असल्याची घोषणा केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी, कर्मचारी हे उशिरापर्यंत कर्तव्यावर असतात. अशावेळी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने उशिरापर्यंत गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 20 नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या गाड्या कल्याण आणि पनवेल या धिम्या मार्गावर धावणार आहेत. निवडणूक कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनादेखील या सेवांचा फायदा होणार आहे. मध्य रेल्वे 20 नोव्हेंबर रोजी विशेष लोकलचे वेळापत्रक लावणार आहे. पहाटे 3 वाजता डाउन मार्गावर सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल आणि अप मार्गावर कल्याण-सीएसएमटी, पनवेल-सीएसएमटी या मार्गावर धावणार आहेत.
20 नोव्हेंबरच्या दिवशी वर्सोवा घाटकोपर मेट्रो 1 च्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी मेट्रो पहाटे 4 वाजता धावणार असून मेट्रो 1ची सेवा मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ‘मेट्रो वन’ची सेवा पहाटे ४ पासून मध्यरात्री १ पर्यंत सुरू ठेवावी, अशी विनंती मुंबई महापालिका प्रशासनाने ‘मेट्रो वन’ प्राधिकरणाला केली होती. त्यानुसार, मेट्रोची सेवा दररोज सकाळी ५.३० वाजता सुरू होते व रात्री वर्सोवा येथून ११.२० वाजता, तर घाटकोपर येथून ११.५० वाजता शेवटची गाडी सुटते. मात्र मतदानाच्या दिवशी या वेळांमध्ये बदल करण्यात आले असून पहाटेपासून ४ मध्यरात्री १ पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे.