यंदा NOTA जिंकणार निवडणूक? वैतागलेल्या मुंबईकरांनी दिला इशारा, राजकारण्यांची चिंता वाढली

Maharashtra Vidhansabha Election : धुळीचं साम्राज्य जिंकणार? नेते हरणार? पाहा मुंबईकरांनी का दिलाय का अंतिम इशारा... प्रशासनाची यावर काय भूमिका?   

सायली पाटील | Updated: Oct 18, 2024, 09:41 AM IST
यंदा NOTA जिंकणार निवडणूक? वैतागलेल्या मुंबईकरांनी दिला इशारा, राजकारण्यांची चिंता वाढली  title=
Mumbai news dadar shivaji park voters to vote for nota amid local issues and administrations ignorance

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकालाचीही तारीख जाहीर केली. अतिशय महत्त्वाच्या अशा या घोषणेनंतर एकिकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच मतदारही त्यांच्या परिनं निवडणुकीसाठी तयार होत आहे. पण, मतदारांची एकंदर भूमिका पाहता, परिस्थिती चिघळल्यास यंदा कोणी नेता नव्हे, तर चक्क नोटा (NOTA) बाजी मारणार असल्याचं चित्र आहे.  (Maharashtra Vidhansabha Election 2024)

नागरिकांनी दिलाय नोटाला मतं देण्याचा थेट इशारा 

मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी वैतागून अखेर आपण नोटालाच मतं देणार असल्याचा इशारा नेतेमंडळींना दिला आहे. दादरमधील शिवाजी पार्क मैदानातील उडणाऱ्या लाल मातीच्या प्रश्नावर या परिसरातील नागरिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. 

मैदानात टाकलेल्या  लाल मातीमुळं परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मैदानात टाकलेली ही लाल माती मुलं खेळत असताना किंवा सोसाट्याचा वारा सुटल्यास परिसरातल्या नागरिकांच्या घरात जाते. त्याचबरोबर प्रदूषणास आणि पर्यायाने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास हानीही पोहोचवते. ही माती काढण्यासाठी येथील रहिवाशांनी काही दिवसांपासून तगादा लावला होता. पण, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचच चित्र आहे. त्यामुळं आता मतदाररुपी नागरिक पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत विधानसभा निवडणुकीत 'नोटा'चा पर्याय अवलंबण्याचा इशारा देताना दिसत आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील येथील रहिवाशांनी मतदानावर बहिष्काराची भूमिका घेतली होती. 98 हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या या मैदानातून उडणारी माती आणि धुळीची समस्या स्थानिक रहिवाशांना अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप या समस्येवर तोडगा निघू शकलेला नाही. 

हेसुद्धा वाचा : '...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरल 

मागील वर्षी एप्रिल महिन्यातही शिवाजी पार्क येथील रहिवासी संघटनेने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. पुढं या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आलं. मात्र काहीच कारवाई झाली नाही, ज्यामुळं तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी पार्क रहिवासी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनाने माती काढण्यास सुरुवातही केली. मात्र निवडणुकीनंतर पावसाळ्यात हे काम थांबलं, ते पुन्हा सुरू झालंच नाही. दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील लाल माती काढण्यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी केली, ज्यानंतर आता पुन्हा हे काम वेगानं सुरु होणार की, यावेळी नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.