Mumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना काही दिवसांपूर्वी जम्बो ब्लॉकमुळं अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रेल्वे यंत्रणेमध्ये नव्या यंत्रणा वापरात आणण्यासाठी म्हणून आणि इतर काही तांत्रिक कामांसाठीचा वेल या जम्बो ब्लॉकमध्ये देण्यात आला. पण, तरीही मध्य रेल्वेची परिस्थिती मात्र फारशी सुधरली नसल्याचंच आता पाहायला मिळत आहे.
सोमवारी मध्य रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्या साधारण 20 मिनिटं उशिरानं धावत होत्या. दादर ते छशिमट अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांदरम्यान रेल्वेचा वेग मंदावल्यामुळं अनेक प्रवासांचा खोळंबा झाला. मंगळवारीसुद्धा परिस्थितीत फारशी सुधारणा नसल्यामुळं नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून बहुविध कामांसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. थोडक्यात प्रवासासाठी जास्तीचा वेळ हाताशी ठेवून निघणंच उत्तम पर्याय राहील असंही सांगण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रेल्वे रुळांवर पाणी आल्यानंतरही मध्य रेल्वेवरील अनेक गाड्यांचा वेग मोठ्या फरकानं मंदावतो. त्यातच आता या विलंबात यंत्रणेमुळं होणाऱ्या उशिराची भर पडताना दिसत आहे.
वस्तुस्थितीनुसार सीएसएमटीत नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवूनही काही तांत्रिक अडचणींमुळे दर दिवशी अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत, तर काही लोकल रद्द केल्या जात आहेत. ही परिस्थिती पाहता प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं आता प्रवाशांच्या या तक्रारी पाहता ऐन पावसाळ्यात त्यावर रेल्वे प्रशासन नेमका कोणता तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.