दारूसाठी पत्नीने पैसे न दिल्याने पतीने बेदम मारहाण करुन केली हत्या; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime : मुंबईत एका पतीने दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीची बांबूने मारहाण करुन हत्या केली आहे. आरोपीला रेल्वे पोलिसांनी मालवणी परिसरातून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आकाश नेटके | Updated: Dec 9, 2023, 11:42 AM IST
दारूसाठी पत्नीने पैसे न दिल्याने पतीने बेदम मारहाण करुन केली हत्या; मुंबईतील धक्कादायक प्रकार title=

Mumbai Crime : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीची हत्या करुन पळ काढला होता. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. गोरेगाव (पूर्व) येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तिची हत्या केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. रेल्वे पोलिसांनी आरोपीला पळून जात असताना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय आरोपीला रेल्वे पोलिसांनी मालाड भागातील मालवणी येथून अटक केली आहे. आरोपी त्याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर मुंबईतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परवीन अन्सारी (26) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी परवीन अन्सारी ही पतीने हल्ला केल्यानंतर तिच्या घरी गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी परवीनला मृत घोषित केले.

पोलिसांनी सांगितले की, 'हत्येचा आरोप असलेला पती दारूच्या पैशावरून दररोज पत्नीशी भांडत होता. 'पती मोईनुद्दीन अन्सारी दारूच्या पैशावरून भांडत असे. गुरुवारी पुन्हा दारूच्या पैशावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतर आरोपीने पत्नीला बेदम मारहाण केली. आरोपी पती अन्सारी नंतर शहरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना बोरिवली रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले.'

पोलिसांनी काय सांगितले?

"बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  मालाड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वेट्रॅकशेजारी झोपडपट्टीमध्ये एका दारुचे व्यसन असलेल्या पतीने पत्नीची लाकडी बाबूंने मारहाण करुन हत्या केली होती. याप्रकरणाची माहिती मिळताच भादवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चार तासांमध्येच मालवणी येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने दारु पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केली," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिली.