दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : भाजपामधल्या मेगाभरतीचा पहिला टप्पा आजपासून सुरू होतोय. त्यापूर्वी आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला.
'मुख्यमंत्री साहेब बोलले होते...'
'आम्ही निवडणुकीपूर्वी मेगाभरती घेऊ...'
'आम्ही येडे नोकरीची भरती समजलो...'
सध्या सोशल मीडियावर हा विनोद वेगात व्हायरल होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगर जिल्ह्यातल्या अकोलेचे आमदार वैभव पिचड आणि नवी मुंबईतले आमदार संदीप नाईक तसंच काँग्रेसचे मुंबईतले नायगावमधले आमदार कालिदास कोळंबकर भाजपात प्रवेश करत आहेत. या पक्षांतरामुळे एकीकडे भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी ५० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा भाजपाचा दावा आहे.
काँग्रेस -राष्ट्रवादीची सत्ता असताना १५ वर्ष हे आमदार राष्ट्रवादीबरोबर होते. मागील पाच वर्ष विरोधी पक्षात काढल्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येणार नसल्याने ते अस्वस्थ आहेत. त्याच अस्वस्थेतेतून मतदारसंघातील विकास कामांचं कारण देऊन हे आमदार राष्ट्रवादीला रामराम करत आहेत. याशिवाय आपल्याला शरद पवारांबद्दल आदर असल्याचं सांगायला ते विसरत नाहीत.
विकास कामांचं कारण देऊन जरी हे आमदार पक्ष सोडून सत्ताधारी भाजपाच्या गोटात सामील होत असले तरी भाजपात जाण्यामागचं प्रत्येक आमदाराचं खरं कारण वेगळं आहे. काही आमदारांच्या सहकारी संस्था अडचणीत असून त्यासाठी सरकारची मदत हवी आहे. तर काही आमदारांची वेगळीच अडचण आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील ही गळती अशीच सुरू राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निराशेचं वातावरण आहे. त्यातच हमखास निवडून येणारे आमदारच पक्षाची साथ सोडून भाजपा आणि शिवसेनेत दाखल होतायत. त्यामुळे दोन्ही पक्षातील हतबलता आणि निराशा आणखीनच वाढताना दिसतेय.