राज्यात कोरोना बाधितांचा आकडा १६ हजारांपेक्षा जास्त ३०९४ ठणठणीत

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. तर ३०९४ जण ठणठणीत बरे झाले आहेत.  

Updated: May 7, 2020, 12:12 PM IST
राज्यात कोरोना बाधितांचा आकडा १६ हजारांपेक्षा जास्त ३०९४ ठणठणीत title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. तर ३०९४ जण ठणठणीत बरे झाले आहेत. काल दिवसभरात १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज साताराऱ्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. कराडमध्ये दोघांना तर साताऱ्यातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर औरंगाबादमध्ये १७ रुग्णांचा वाढ झाली आहे. रत्नागिरीतही कोरोनाचा आकडा वाढला आहे. हा आकडा १७ च्या घरात पोहोचला आहे. नागपुरात ४४ ने आकडा वाढला आहे. तर येवला येथे दोन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. 

राज्यात काल १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र, असे असले तरी मालेगाव, औरंगाबाद, नागपूर आणि ठाणे, नवी मुंबई येथे कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे रेड झोनमध्ये कोरोना साखळी मोडण्यात म्हणावे तसे यश येत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान, राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १०४८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून काल एकूण ११ हजार ६९२ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५१.१४  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९  नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १६ हजार ७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बुधवारी राज्यात ३४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६५१ झाली आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत.