Sanjay Gandhi National Park : मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीमधील 'मानसी' नावाच्या मादीने गुरुवारी रात्री एका छाव्याला जन्म दिलाय. सिंह सफारीसाठी गुजरातहून आणलेली 'मानस' आणि 'मानसी' ही सिंहाची जोडी पर्यटकांचे आकर्षण बनली होती. मानस आणि मानसी ही जोडी जुनागढ वरून 2022 मध्ये आणली होती .2024 मध्ये मानसी सिंहीण आजारी पडली होती. तब्बल 18 दिवस तिने काहीच खाल्ले नव्हते. बऱ्याच जणांनी तिची आशा सोडली होती. पण आम्ही काही जणांनी ठाम विश्वास ठेवून तिची अखंड शुश्रुषा केली. त्यामधून ती बरी झाली.
त्यानंतर मानस बरोबर तिचं मिलन केलं. त्या दोघांना एकत्र करणही सोपं नव्हतं. मानस सुरुवातीला डरकाळी फोडून तिच्या अंगावर धावायचा. तिला ओरबाडायचा. ही बिचारी घाबरून जायची. पण आम्ही धीर न सोडता त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र करायचो. हळूहळू ते एकत्र रुळले आणि चक्क एकमेकांच्या प्रेमात पडले. 30 सप्टेंबरला यांचं शेवटचं मिलन झालं आणि मानसीचा मिलन काळ संपला. नोव्हेंबर 2024 मध्ये तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे समजले.
काल रात्री मानसीने साडे नऊ वाजता तिच्या पिल्लाला जन्म दिला. छावा आणि मानसी दोघेही सुखरुप असून सध्या त्यांना वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 2009 मध्ये रवींद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली होती. गोपा आणि जेस्पा हे या जोडीचे छावे होते. सिंहाचे हे चौकोनी कुटुंब गेली अनेक वर्षे पर्यटकांसाठी आकर्षण ठरले होते. परंतु, काही वर्षांपूर्वी शोभाचा मृत्यू झाला. त्यानंतर हे कुटुंब त्रिकोणी झाले. 2021 मध्ये गोपाला आजाराने घेरले. त्यावेळी तिचा मृत्यू झाला. 2022 मध्ये 17 वर्षीय रविंद्र देखील मृत पावला. त्याच महिन्यात जेस्पाचा देखील मृत्यू झाला. यानंतर 2022 मध्ये गुजरातमधून मानस आणि मानसी नावाच्या जोडीला उद्यानात आणण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीला चांगले दिवस आले.