अजित पवारांवर ज्या खात्यावरुन आरोप झाले तेच 'जलसंपदा' पुन्हा मिळणार?

Ajit Pawar: आघाडीच्या सरकारमध्ये कथितरीत्या 72 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. 2014 च्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा लावून धरण्यात आला होता.

Pravin Dabholkar | Updated: Jul 2, 2023, 04:51 PM IST
अजित पवारांवर ज्या खात्यावरुन आरोप झाले तेच 'जलसंपदा' पुन्हा मिळणार?

Ajit Pawar: राज्याच्या राजकारणातला मोठा भूकंप आज जनतेला पाहायला मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या 9 आमदारांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होता. काही दिवसांपुर्वी अजित पवारांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद मागितले होते. यावर 6 जुलैला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल असे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. याला काही मिनिटे उलटत नसतानाच अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन राजभवनाच्या दिशेने रवाना झाले. आणि पुढच्या काही वेळातच मंत्रिपदाचा शपधविधी पाहायला मिळाला. 

आता राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभाग संभाळणार आहेत. दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरु लागली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना कोणते मंत्रीपद मिळणार? याबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जलसंपदा खाते मिळण्याची शक्यता आहे. हे तेच खाते आहे, ज्यावरुन अजित पवार यांच्यावर विरोधकांनी जोरदार टिका केली होती. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं सरकार सत्तेवर असताना अजित पवार जलसंपदा खाते संभाळत होते. त्यांच्याकडे विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे (VIDC) अध्यक्ष पदही होते. त्यावेळेस झालेल्या कथित सिंचन घोटाळ्यावरुन अजित पवारांना घेरण्यात आले होते. 

आघाडीच्या सरकारमध्ये कथितरीत्या 72 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. 2014 च्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा लावून धरण्यात आला होता.

त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे काही तासांचे सरकार अस्तित्वात आले होते. याच्या काही तासातच अजित पवारांना सिंचन घोटाळा प्रकरणातून दिलासा मिळाला होता. त्यावेळी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निर्णनानुसार अजित पवारांशी संबंधित 9 प्रकरणांची चौकशी थांबविण्यात आली. 

दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांनी  दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.  शिवसेना-भाजपचं फिस्कटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्याने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

आता राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झाले आहे. त्यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खाते जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठामंत्री तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ऊर्जा खाते दिले जाण्याची शक्यता आहे. 

हसन मुश्रीफ यांना कौशल्य विकास, धनंजय मुंडे यांना गृहनिर्माण तर आदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण हे खाते दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे संजय बनसोडे यांच्याकडे पर्यटन, अनिल पाटील यांच्याकडे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण आणि धर्मरावबाबा आत्राम यांना आदिवासी कल्याण विभाग दिला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.