मुंबई पुन्हा थांबली; अनेक भागांत वीजपुरवठा खंडित

बत्तीगुल! 

Updated: Oct 12, 2020, 11:03 AM IST
मुंबई पुन्हा थांबली; अनेक भागांत वीजपुरवठा खंडित  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सोमवारी सकाळच्या सुमारास आठवड्याची सुरुवात झालेली असतानाच आणि ऐन कार्यालयीन कामांना वेग आलेला असतानाच संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. अचानक मुंबई शहरात वीज गेल्यामुळं अनेक कामांमध्ये अडथळे आल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा रुळावर येणाऱ्या रेल्वे सेवेवरही याचा थेट परिणाम झाला आहे. 

ग्रीड फेल झाल्यामुळं वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्य मुंबई शहरासह पश्चिम उपनगर आणि नवी मुंबईतही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. परिणामी मागील काही वेळापासून वेग पकडलेलं हे शहर पुन्हा एकदा थांबल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

अति उच्चदाब वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठा बंद झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळं मुंबई उपनगरांमध्ये मुलुंड , भांडुप, नाहूर , कांजुर , विक्रोळी , आणि घाटकोपरच्या काही भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईच्या रस्त्यावरील सिग्नल बंद झाले आहेत. शिवाय मुंबईच्या वाहतुकीवर नजर असणारी सीसीटीव्ही यंत्रणा ही बंद. 

महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे.

ठाण्यात कोपरी, चंदनवाडी, वागळे इस्टेट, नौपाडा, माजीवडा, हिरानंदानी, घोडबंदर,  परीसर, बाळकूम परीसर तर, रायगड जिल्ह्यात अलिबाग , पेण , पनवेल , उरण , कर्जत , खालापुरातील वीज पुरवठा खंडित.