मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई NCB म्हणजे नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अंमली पदार्थ गुन्ह्यांबाबत कारवाया कमी झाल्या असून मुंबई पोलीस गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ गुन्ह्यांबाबत अधिक कारवाई करताना दिसत आहे. मुंबई पोलीसांनी आज 2.90 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली.
पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर दोन परदेशी नागरिक अंमली पदार्थ जवळ बाळगलेल्या असल्याचे सापडेल अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या वांद्रे युनिटच्या पथकाने पहाटे दिडच्या सुमारास पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावरील पॉवर स्टेशनजवळ दोघांना पकडले अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. मेफेड्रोन नावाचे हे ड्रग्ज मानखुर्द परिसरातून पकडले असून त्याची किंमत 2.90 कोटी रुपये एवढे आहे. 2.90 कोटी रुपयांचे हे ड्रग्ज 1.4 किलोग्रॅम होते.
अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकांपैकी एकाचा 2016 मध्ये पालघरमध्ये झालेल्या हत्येमध्येही कथित सहभाग आहे, अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर एएनसीचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले की, एक पथक या ड्रग्ज नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी काम करत आहे आणि ते एका टोळीचा भाग असल्याचा संशय आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि परिसरात अंमली पदार्थजवळ बाळगल्या प्रकरणी, अंमली पदार्थांचे सेवन आणि अंमली पदार्थ खरेदी-विक्रीबाबत अनेक कारवाया मुंबई पोलिसांनी केलेल्या आढळून आल्या आहेत.
दरम्यान NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली झाल्यापासून NCB मुंबईत फारश्या कारवाया करताना दिसत नाहीत. समीर वानखेडे यांनी अंमली पदार्थबाबत अनेक कारवाया केल्या. यातील बहुतांश कारवाया या बॉलीवूडमधील सेलिब्रिटींशी निगडीत होत्या. दरम्यान वादात अडकल्यानंतर समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली. यानंतर मुंबई पोलीस मात्र अंमली पदार्थांबाबत अधिक कारवाया करताना दिसत आहेत.
anti narcotic bureau of mumbai police action on naigerian drug cartel in mumbai