उस्मानाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका आता देवस्थानांनाही बसू लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध देवस्थानांनी कोविड नियमांमुळे केवळ ऑनलाईन पास धारकांनाच मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही देवस्थानांनी होणारी गर्दी टाळण्यासाठी यात्रा रद्द केल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा असंख्य लोकांचे कुलदैवत आहे. यंदा १६ ते १८ जानेवारी या काळात श्री खंडोबाची यात्रा भरणार होती. तर, १७ जानेवारी रोजी छबिना निघणार होता.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून किमान पाच ते सात लाख भाविक या यात्रेसाठी हजेरी लावत असतात. श्री खंडोबा - बाणाई यांचे हे विवाहस्थळ आणि जवळच भुईकोट किल्ला असल्यामुळे या यात्रेला मोठी गर्दी असते. परंतु, राज्यात पुन्हा कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागली आणि कोरोनाचे निर्बध लागू झाले. यामुळे या यात्रेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.
कोरोनामुळे नळदुर्गच्या श्री खंडोबाची महायात्रा रद्द pic.twitter.com/fX05CZ5GZU
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 11, 2022
नळदुर्ग पोलिस स्टेशनचे सपोनि सुधीर मोटे, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जानराव, महावितरणचे कनिष्ठ अभियंता गायकवाड, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुधीर सूर्यकांत पाटील, नगरसेवक आप्पा धरणे, अणदूर यात्रा कमिटीचे अध्यक्ष मनोज भीमाशंकर मुळे, मैलारपुर (नळदुर्ग) खंडोबा मंदिर समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश मोकाशे, उपाध्यक्ष अविनाश मोकाशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शांतता कमिटीच्या बैठकीत कोरोना नियमावली वाचून दाखवण्यात आली. तसेच, होणारी गर्दी लक्षात घेता करायची उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री खंडोबाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. १६, १७ आणि १८ जानेवारी रोजी मंदिर परिसरात संचारबंदी लागू असून काही मोजक्या पुजारी आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रथा परंपरेनुसार धार्मिक विधी संपन्न होणार आहेत.
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही श्री खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. १६ ते १८ जानेवारी दरम्यान मैलारपूर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. व्यवसायिकांना दुकाने लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. तसेच, बाहेरगावच्या भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने यावेळी करण्यात आले.
धार्मिक विधी पार पडणार
कोरोनामुळे महायात्रा रद्द करण्यात आली असली तरी येथील सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. नळदुर्ग व अणदुरच्या प्रत्येकी पंचवीस मानकऱ्यांना या काळात पारंपरिक विधीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.