यवतमाळ : यवतमाळच्या नेर शहरात ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून आरोग्य यंत्रणेमार्फत नागरिकांचा सर्व्हे केला जात आहे. मात्र ही अत्यावश्यक सेवा आपला जीव धोक्यात घालून बजावणाऱ्या आरोग्यसेविकांशी काही नागरिकांनी हुज्जत घातल्याचा संतप्त प्रकार पठाणपुरा परिसरात घडला.
आरोग्यसेविका पठाणपुरा परिसरात सर्व्हेसाठी गेल्या होत्या. दरम्यान याठिकाणी मोईन पटेल आणि शकील कुरेशी या दोघांनी या आरोग्यसेविकांना रस्त्यात अडवून धरले आणि जनसमुदाय गोळा करून त्यांच्याशी बाचाबाची सुरु केली. तुम्ही कोण आहात असा प्रश्न करून त्यांनी तुम्ही सर्व्हे कसे काय करता असे प्रश्न विचारले.
त्यानंतर या आरोग्यसेविकांकडील गळ्यातील ओळखपत्रे ओढाताण करून शासकीय कामात व्यत्यय आणला. यावेळी उपस्थितांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन केले नाही शिवाय तोंडाला मास्क बांधला नाही असे करून त्यांनी साथरोग पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत पठाणपूरा येथील नागरिकांनी आरोग्यसेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. पुन्हा या परिसरात आले तर तुम्हाला पाहून घेऊ अशा शब्दात त्यांनी धमकावले असल्याची तक्रार आहे.
यापूर्वी यवतमाळ शहरात देखील सर्व्हे करणाऱ्या आशा यांचेशी देखील दोन युवकांनी हुज्जत घातली होती.