Chhagan Bhujbal: भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस दिले जाईल असे आवाहन परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केले. याला आता राज्याचे मंत्री आणि समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. हे लोक घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
कोणी म्हणतंय याला मारा बक्षिस देऊ. अशा प्रकारच्या धमक्या आणि शिवगाळ करणाऱ्यांना माझा विरोध आहे.जर कोणी चुकत असेल तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी असे ते यावेळी म्हणाले. माझ्याकडे खूप काम आहे, मी ते करत असतो.पोलिसांनी त्यांचे काम करतील असे त्यांनी सांगितले.
मनोहर कुलकर्णी हे संभाजी नाव वापरुन आमच्या दैवतांची बदनामी करतात. संभाजी भिडे कोण आहेत? या प्रश्नाचे आधी त्यांनी उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी विश्वजीत देशपांडे यांनी केले.
परशुराम संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांच्या विधानानंतर समता परिषदेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. देशपांडेला अटक करा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली. यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी देशपांडे याच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले. तसेच त्यांच्याविरोधात घोषणा देऊन निषेधही व्यक्त करण्यात आला.
ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये पण ब्राह्मण समाजात लोक त्यांच्या मुलांची संभाजी आणि शिवाजी अशी नावं ठेवत नाहीत, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ब्राह्मण महासंघाकडून जोरदार टिका करण्यात आली. यानंतर कुठल्याही समजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, असे म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिले होते.
महात्मा फुले यांना मुलींची शाळा काढण्यासाठी भिडे यांनी वाडा दिला आणि तिथे शाळा सुरू झाली. या कामात पुढे अण्णासाहेब कर्वे यांनी योगदान दिलं. ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना विरोध नाही, असे मी म्हणाले. पूर्वी ब्राह्मणांच्या मुलींनासुद्धा शिक्षण मिळत नव्हतं ते सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी सुरू केलं. त्याचा जो काही ऐतिहासिक पुरावा असेल त्यावर चर्चा करता येईल, असे भुजबळ म्हणाले होते.