Kalyan Crime News: कल्याण येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने बुलढाणा येथील शेगाव येथून विशाल गवळी याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या घरात लपून बसला होता, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर कल्याण पूर्वेत संतापाची लाट पसरली असून विशाल गवळीला कठोरातील कठोर शिक्षा म्हणजेच त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली आहे. नेमका घटनाक्रम कसा घडला याचा सविस्तर आढावा जाणून घेऊया.
23 तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला. बराच कालावधी उलटून ही मुलगी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गांभीर्य दाखवत या प्रकरणाचा तपास सुरू केला .दुसऱ्या दिवशी 24 डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याणनजीक बापगाव परिसरात सापडला. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांची पथके तयार करण्यात आली.
या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणातील दोन आरोपीची ओळख पटवली. त्याच परिसरात राहणारा विशाल गवळी आणि त्याची पत्नी या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशाल गवळी विरोधात याआधी देखील चार विनयभंगाचे गुन्हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचे समोर आले आहे. त्याने आतापर्यंत तीन लग्न केली असून सध्या तो तिसऱ्या बायकोबरोबर राहतो. पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत याच पत्नीने त्याला मुलीचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी विशाल गवळीचा शोध सुरू करत त्याला बुलढाणा येथील शेगाव येथून ताब्यात घेतलं तर पोलिसांनी या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली रिक्षा देखील ताब्यात घेतली आहे. या रिक्षा चालकाचा गुन्ह्यात किती सहभाग आहे. याबाबतची चौकशी सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.
विशालने सायंकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलीला घरात नेले. मुलीसोबत गैरकृत्य करून तिची हत्या केली. त्यानंतर विशालने एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. सात वाजता एका खाजगी बँकेत काम करणारी त्याची पत्नी घरी आली तेव्हा घडलेला प्रकार पत्नी साक्षीला सांगितला. पती विशालने केलेल कृत्य ऐकून साक्षीला धक्का बसला. दोघे पती पत्नीने एकत्र बसून आधी घरातले रक्त पुसले त्यानंतर या मृतदेहाचे काय करायचे याबद्दल योजना आखली. रात्री साडेआठ वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. नऊ वाजता बापगवच्या दिशेने रवाना झाले. मृतदेह फेकून दोघे परतले परतत असताना विशाल याने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या घरी बुलढाणा येथे निघून गेला. पत्नी साक्षी येथेच राहिली. घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल याने हे कृत्य केल्याचा संशय आला. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने हा उलगडा केला.