Virar Sucide: कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. दरम्यान सर्वसामान्यांच्या मनात पोलीस नावाबद्दल आदरयुक्त भीती असते. बऱ्याचदा पोलीस नाव ऐकलं तरी काही चूक नसतानाही अनेकांची भांबेरी उडते. त्यात जर पोलिसांनी काही सांगितल्यावर आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून लक्षपूर्वक ऐकले जाते. दरम्यान पोलिसाने दिलेल्या धमकीला घाबरुन एका तरुणाने आयुष्याचा शेवट केलाय. विरारमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
पती-पत्नीमध्ये भांडण होण्याचे प्रकार अनेकदा समोर येत असतात. भांडणे टोकाला गेल्यावर त्यांना पोलिसांची पायरी चढावी लागते. अशाच प्रकारे पती-पत्नीचे भांडण झाल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात आली. दरम्यान यातील पतीला विरार पोलिसांनी धमकी दिल्याचा प्रकार घडला.
जेलमध्ये टाकून सडत ठेवण्याची धमकी दिल्यामुळे तरुण घाबरला. यानंतर त्याने स्वतःचा व्हिडिओ तयार करून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी धमकावल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं या व्हिडिओत म्हटलं आहे. यानंतर संबंधित पोलिसांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. अभय पालशेतकर असे 28 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
तुला जेलमध्ये टाकू आणि कायमचे खडे फोडायला लावू. तुला कोण वकील देतो ते आम्ही पाहू, अशा प्रकारे धमकावण्यात आल्याचे अभयने आपल्या व्हिडीओत म्हटलंय. यामुळे आपण आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवत असल्याचे त्याने सांगितले.
घरगुती कारणावरून अभयच्या बायकोने अभय आणि त्याच्या आईविरोधात एनसी दाखल केली होती. सुनील पवार नावाच्या पोलिसाने ही तक्रार घेतली. तुला कोंबडा करून मारु, टायरमध्ये घालून मारू अशी धमकी त्यांनी दिली होती, असे अभयने व्हिडीओत म्हटलंय.
या धमकीला घाबरून अभयने आपला स्वतःचा एक व्हिडिओ तयार केला आणि स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. संबंधित पोलिसावर तत्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.