Walmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट

Walmik Karad :  बीडमधील मकोकावर असलेल्या आरोपीची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आरोपीने कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप पोस्ट करून वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 23, 2025, 04:04 PM IST
Walmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट title=

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. बीडमधील मकोकातल्या आरोपीने वाल्मिक कराडवर आरोप केले आहेत. मकोकातर्गंत अटकेत असलेल्या सनी आठवले याने एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करत कराडवर खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय. पोलिसांशी लागेबांधे असल्याचा त्याने आरोप करत पोस्ट केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ बोलत असल्याचा दावा या आठवलेने केलाय. 

सनी आठवले हा बोगस नोटा प्रकरणातील आरोपी आहे. उपकाराच्या ओझ्याखाली ठेवून गुन्हेगारीत ओढल्याचा आरोप सनी आठवलेने फेसबुक पोस्टद्वारे केलाय. या पोस्टमध्ये लिहिलंय की, वाल्मिक कराड तरुणांवर पाहिले खोटे गुन्हे दाखल करायला लावतो आणि नंतर सहानुभूती मिळवण्यासाठी पोलिसांना फोन करून गुन्हे मागे घ्यायला लावतो. 

सनीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ फोन केल्याचा दावा केलाय. वाल्मिकने बल्लाळ यांना फोन करुन म्हटलं की, "त्या सनीला नका गुतवू, संशयितमध्ये त्याची चूक झाली. ते माफी मागायला लागलंय जावुद्या द्या विषय सोडून द्या" असं संभाषण ऐकू येतं. महत्वाचं म्हणजे सीआयडी आणि एसआयटी कोठडीत असताना वाल्मिक ज्या शहर पोलीस ठाण्यात होता तिथेच हे बल्लाळ सध्या पोलीस निरीक्षक आहेत.

हेसुद्धा वाचा - Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?

ही ऑडिओ क्लिपसोबत आठवले यांनी बरं काही लिहिलंय. बीडमध्ये नेमकं चाललय काय? का मला गुंतविले जातंय? खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत? देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उध्वस्त केले जाते? देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेले बरे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र असून मी ना.धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेले होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मीक अण्णा कराड यांना माझा राग आल्याने सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतविण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना दिले होते. त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावले होते. मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलविण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनामधे धरत व अण्णाच्या सांगण्यावरून बनावट नोटा छापाईच्या प्रकरणांमध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आले आहे.
दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत बनावट नोटा छपाई प्रकरणी मनीष क्षिरसागर हा माझा मित्र आहे मात्र तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही. वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे काम करत आहेत. माझ्यावर बनावट नोटा छापाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिकांना कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला व मी आमदाराचे काम करत आहे माझं चुकलं मला माफ करा असे बोलल्यानंतर लागलीच वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना फोन करून "त्या सनीला नका गुतवू संशयितमध्ये झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला लागलंय जावुद्या द्या विषय सोडून" अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका संदीप क्षिरसागर शिफारस करत आहे. अशा आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाउंट वरून आपणास शेअर करत आहे.
या अगोदर पोलीस उपनिरीक्षक केज राजेश पाटील, चंद्रभान गीते यांनी अक्षय आठवले यास मादळमोही या ठिकाणाहून अटक केले होते परंतु एफ.आय.आर मध्ये केज तालुक्यातील बरड फाटा येथे अटक केल्याचे दाखवले आहे याबाबत पुराव्यानिशी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे तक्रार सादर केले असून त्यामध्ये पाडळशिंगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज जोडण्यात आलेले आहेत सदर प्रकरणी वाल्मीकांना कराड यांनीच या खोट्या गुन्ह्यांमध्ये माझे नाव जाणीवपूर्वक टाकले होते.
अशा पद्धतीने वाल्मिक अण्णा कराड यांनी असंख्य युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला फोन करणे गुन्हा वापस घेणे बाबत सांगणे आणि मग गुन्हा दाखल झाल्यानंतर तो युवक पुन्हा त्यांचं काम करायला लागतो अशा पद्धतीने त्यांनी माझाही मिस युज करायचा प्रयत्न केला होता परंतु ते मला आवडले नसल्याने मी नामदार धनंजय मुंडे यांच्यापासून दूर आलो होतो.
आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश आण्णा धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया, सोशल मीडियावरील माझा मित्रपरिवार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्युब चॅनेल्स, या क्लिपच्या माध्यमातून मला न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा बाळगतो मी गुन्हेगारी सोडून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे हेच यांना खुपत आहे.
आणि आठवले गँग हा शब्द वापरू नये ही कळकळीची विनंती आम्ही गुन्हेगारी सोडून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत परंतु राजकीय आसरा घेत पोलीस प्रशासनातील काही अधिकारी-कर्मचारी जातीय द्वेष सामोरे ठेवून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी माझ्या घरी येऊन तुमच्या आशिष अक्षय आणि सनी यांना नको का लावणार आणि देशद्रोहासारख्या गुन्ह्यामध्ये आत मध्ये टाकणार आणि त्याची शिफारस मीच करणार अशा पद्धतीची धमकी दिली होती यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे रीतसर तक्रार माझ्या आईने दिलेली आहे. ती ही आपणास शेअर करतो.
सध्या पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मीक अण्णा कराड यांचे काम करतात आणि गेल्या अनेक दिवसापासून शहर पोलीस स्टेशन येथील लॉकअप मध्ये त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट पुरवतात एस पी साहेब आपण याकडे ही लक्ष द्यावे आणि पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या मोबाईलचा डम डाटा सीडीआर तपासावा जेणेकरून आपणास लक्षात येऊन जाईल की वाल्मीक अण्णा कराड व पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांचे मैत्रीचे संबंध आहेत म्हणून तर प्रत्येक वेळी शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिकांना कराड सोबत असतात मग ते माध्यम कोणतेही असो आणि पोलीस निरीक्षक बल्लाळ यांचेही कारनामे एस पी साहेबांनी पहावे गोंदी येथील झालेला प्रकार माजलगाव येथील झालेला प्रकार खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणे अपेक्षित आहे, असे सनी आठवले याने पोस्टमध्ये लिहिलंय.