उदयनराजे भोसलेंचा खासदारकीचा राजीनामा, दोन अटींवर भाजप प्रवेश?

 खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. 

Updated: Sep 14, 2019, 08:24 AM IST
उदयनराजे भोसलेंचा खासदारकीचा राजीनामा, दोन अटींवर भाजप प्रवेश? title=

मुंबई : मध्यरात्री साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी आज सकाळी ९ वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचवेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार घेणार आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी सोपवला. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. सकाळी ९ वाजता उदयनराजे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे विद्यमान खासदार भाजपाच्या गळाला लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठे आव्हान आहे. सातारा येथील लोकसभेची निवडणूक आता विधानसभेसोबत होते, की नंतर याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. मात्र या निवडणुकीत साताऱ्यातून उदयनराजे पुन्हा निवडून आल्यास राष्ट्रवादीसाठी ती मोठी नामुष्की असेल. 

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी भाजपपुढे दोन अटी ठेवल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. साताऱ्यात विधानसभेबरोबर पोटनिवडणूक घ्यावी. यावेळी आपल्या उमेदवारी जाहीर करावी. जर या निवडणुकीत दगाफटका बसला तर राज्यसभेवर घ्यावे. या दोन्ही अटी मान्य झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश निश्चित झालाचे वृत्त आहे.