Fadnavis Says Me Punha Yein: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीपासून चांगलेच चर्चेत आहेत. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीपासूनच महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे फडणवीसांची चांगलीच चर्चा अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसून आली. आपली मुत्सद्देगिरी आणि नेतृत्वाच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा भाजपाला राज्यात 100 हून अधिक जागा मिळवून देण्याची कामगिरी फडणवीस यांनी केल्यानंतर अनेकांना त्यांची पूर्वीची वाक्य, विधानसभेमधील भाषणं आठवली. खास करुन 'मी पुन्हा येईन' वरुन अनेकांनी फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 'तो पुन्हा आलाय' म्हणत त्यांचे कौतुक करणारे फोटो आणि व्हिडीओ स्टेटला ठेवले होते. मात्र आता मुख्यमंत्री झाल्यानंतर दहा दिवसांच्या आतच फडणवीसांनी पुण्यात पुन्हा एकदा 'पुन्हा येईन'चा नारा दिला आहे. फडणवीस आता कशासंदर्भात आणि का असं म्हणालेत ते पाहूयात...
पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळेस फडणवीस यांनी अनेक पुस्तकांच्या स्टॉलला भेटी तर दिल्याच शिवाय त्यांनी एक छोटेखानी भाषणही केलं. या भाषणामध्ये फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा उल्लेख केल्याचंही पाहायला मिळालं. "मी दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहे. प्रमोद महाजन असे म्हणायचे की, सुज्ञ माणसाने एका कार्यक्रमात दोनदा जाऊ नये. कारण मागच्या वेळी जे बोललो तेच जर पुन्हा बोललात तर लोक काय म्हणतील? पण हा कार्यक्रमच एवढा चांगला आहे की, इथे आल्यानंतर मी एवढेच म्हणेन, 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...' फडणवीसांनी असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुढे बोलताना फडणवीसांनी, "मी दरवर्षी येईन" असंही म्हटलं.
फडणवीस यांनी आपल्या खास शैलीमध्ये शेजारीच सुरु असलेल्या खाद्य मोहोत्सवाला आपल्याला कोणी फिरकू देत नाही असं म्हणत मजेदारपद्धतीने खंत व्यक्त केली. "इकडे खाद्य महोत्सव पण आहे. पण तुम्ही मला तिकडे फिरकू देत नाही. पण पुढच्या वेळेस पुस्तक महोत्सव झाला की खाद्य महोत्सव रिझर्व्ह ठेवा," अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
"सहाव्या शतकात नालंदा विद्यापीठ हे सर्वात मोठं ज्ञानाचं भंडार मानल जायचं. खिलजी नावाच्या त्या वेड्या माणसाने हल्ला केला आणि ग्रंथ संपदा जाळून टाकली. तीन महिने लागले आग विजवायला. तीन महिने आग जळत होती. पण ग्रंथांचं आणि आपलं नातं हे चिरकाल नातं आहे. चारही दिशेने येणार ज्ञान आपण ग्रहण केलं पाहिजे. या देशानं नेहमी ज्ञानाची पूजा केली आहे. ग्रंथाची पूजा केली आहे. ग्रंथ जगतील का याचं उत्तर हे महोत्सव देतात. जो पर्यंत सृजनशीलता आहे तो पर्यंत पुस्तक मरत नाही," असं फडणवीस म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "शासन म्हणून जी आवश्यतक असेल ते आपण करू! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेला राजमान्यता देण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं आहे," असंही फडणवीस म्हणाले.
Keeping book-reading alive : The Pune Book Festival Journey!
Delighted to inaugurate the 'Pune Book Festival' in the cultural capital of Maharashtra, Pune. Books open doors to new worlds, and Pune, with its rich intellectual legacy, continues to ignite curiosity and inspire… pic.twitter.com/NIUrACJAWv
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 14, 2024
मुख्यमंत्र्यांनी, "मी पुढच्या वर्षी पुन्हा हे येईन सांगुन थांबतो,* असं म्हणत भाषण संपवलं. फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या सोहळ्यातील काही फोटोही शेअर केले आहेत.