शर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात... चार जणांविरोधात गुन्हा दाखल

नांदेड जिल्ह्यात पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पण ज्या कारणासाठी या चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला ते कारण राज्यभर चर्चेचा विषय ठरलं आहे. या चौघांनाही स्टाईल करणं चांगलंच महागात पडलं आहे. 

सतिश मोहिते | Updated: Sep 20, 2023, 07:45 PM IST
शर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात... चार जणांविरोधात गुन्हा दाखल title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मारामारी, चोरी किंवा इतर वेगवेगळ्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण कधी शर्टाचं बटण उघडं ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे. नांदेडमध्ये एक, दोन नाही तर चक्क चारजणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हे अपवादात्म प्रकरण असल्याने राज्याभरात चर्चेचं कारण ठरलं आहे. 

काय आहे नेमकी घटना?
पोलीस ठाण्यात  शर्टचं बटन उघडे ठेऊन येणं चार जणांना चांगलंच अंगलट आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी (Public Places) असभ्य वर्तन केल्याच्या कलमाखाली चार जणांविरोधात चक्क गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस स्टेशनमधील (Loha Police) ही घटना आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी लोहा पोलीस ठाण्यात हे चार जण आले होते.  कुणी केसच्या संदर्भात आले होते, तर कुणी काही कामानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये आले होते. पण यावेळी पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांना या व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये शर्टचं वरचं बटन उघडे ठेऊन आल्याचं दिसलं. 

या चौघांविरुदध सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी कलम 110, 112 आणि 117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे तसंच शिस्तीचे ठिकाण आहे. या ठिकाणी शर्टचं बटन उघडे ठेऊन आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निर्माण निरीक्षक ओमकांत चींचोलकर यांनी सांगितलं.

मित्राच्या खुनाचा उलगडा
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी एका खुनाची उकल केली आहे. पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने दोन मित्रांनी आपल्याच एका मित्राची हत्या केली. त्यानंतर त्याच मृतदेह पिंपरीच्या नाशिक फाट्यावरुन खाली फेकून दिला. सहा महिने या हत्येबाबत कोणालाही थांगपत्ता लागला नाही. पण सहा महिन्यांनी मृत तरुणाच्या आईने वाकिस पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी मृत दिनेश कांबळे हा मृत्यूच्या दिवशी सिद्धांत पाचपंडे आणिक प्रतीक सरवदे या दोन मित्रांबरोबर दारू पित होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सिद्धांत आणि प्रतीक या दोन मित्रांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला या दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसी खाक्या दाखवतात दोघांनी दिनेश कांबळेच्या हत्येची कबुली दिली. सिद्धांत प्रतीक आणि मृत दिनेश कांबळे काळेवाडी परिसरात दारू पित असताना दिनेशने प्रतिकच्या पत्नी बद्दल अपशब्द वापरले, त्यामुळे संतापलेल्या प्रतीकने दिनेशच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने हल्ला केला. जखमी दिनेशला त्यानंतर थेट नाशिक फाट्याच्या पुलावरून खाली फेकून दिलं. त्यांच्या अंगावर अनेक गाड्या गेल्याने त्याला ओळखणे ही अवघड झाले होतं.