Gondia ST Bus Accident : एसटी महामंडळाच्या बेदरकार कारभाराचा नमुना उघड झाला आहे. एसटी बस तीन चाकांवर धावली आहे. एसटी महामंडळाच्या चालत्या बसचा टायर निखळून शेतात गेला. यानंतर एसटीबस काही अंतरा पर्यंत तीन चाकांवरच धावली आहे. ड्रायव्हरच्या प्रसंगधावणामुळे मोठा अपघात टळला आहे. गोंदियात ही थरारक घटना घडली आहे.
गोंदिया आगाराची एसटी बस चक्क तीन चाकांवर धावली आहे. धावत्या बसचं एक चाक निखळल्यानं बस काही अंतरापर्यंत तीन चाकांवरच धावली. ही बस तुमसरवरून गोंदियाकडं जात होती. गंगाझरी आणि डोंगरगाव दरम्यान, बसच्या समोरील टायर निघाले आणि बाजूच्या शेतात गेले. बसमधून 16 प्रवासी प्रवास करीत होते. यावेळी काही प्रवाशी किरकोळ जखमी झालेयत. ड्रायव्हरनं प्रसंगावधान ओळखत मोठ्या शिताफीनं बस थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांची सुखरुप सुटका झाली.
30 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागच्या 3 चाकांवर एसटी बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार यापूर्वी देखील उघड झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसा-याला निघालेल्या या बसच्या मागच्या चार चाकांपैकी एक चाक नव्हतं. तशा स्थितीत ही बस धावली. अखेर एका वाहनचालकाने हा प्रकार लक्षात आणून दिल्यावर ही बस इगतपुरीजवळ थांबवण्यात आली. MH 14 BT 4129 हा बसचा नंबरची ही बस होती. यामुळे एसटीमध्ये असलेल्या 30 हून अधिक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. अकोलेहून कसारापर्यंत अनेक वळणदार रस्ते, घाट असल्याने अशा बेजबाबदारपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ ते मुक्ताईनगर दरम्यान एसटीचालक कानाला हेडफोन लावून, हातात मोबाईल आणि व्हिडीओ पाहत दुस-या हाताने बस चालवत होता. या बस चालकाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नावाजलेली एसटीबस खरच सुरक्षीत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
सांगलीत एक अजब प्रकार घडला होता. एसटी खराब झाल्यानं एसटी चालकाला स्वताच्या हाती बसचं स्टेअरिंग, तर चक्क एक्सिलेटरला दोरी बांधून ती महिला कंडक्टरच्या हातात दिली होती. जवळपास 40 किलोमीटरपर्यंत ही तारेवरची कसरत चालू होती. प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून नाईलाजास्तव चालकाला हा जुगाड करावा लागला होता.