प्रथमेश तावडे, झी मीडिया
Virar Murder Mystery: हत्येच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी कोरोना काळात सुटल्यानंतर त्याने बाहेर येऊन पुन्हा एकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार विरारच्या मांडवी पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. विनोद उर्फ कांद्या महादू बसवंत असं या सिरीयल किलरचं नाव आहे.
दोन दिवसांपूर्वीच आरोपी कांद्या बसवंत याने एका मांत्रिकाची दोन हजार रुपयांसाठी दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्याला मांडवी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील उसगाव गावात राहतो. त्याची पत्नी घर सोडून गेल्याने त्याने जवळच्या गावातील वृद्ध भगत मंत्रिक भिवा वायडा (७५) याला पूजापाठ करून माहिती घेण्यासाठी दोन हजार रुपये दिले होते.
पैसे देऊनही भिवाने पूजा पाठ केला नाही तसंच पैसेही परत देत नव्हता या रागात त्याने गोड बोलून त्याची भेट घेतली. भिवासोबत मद्यपान केले व उसगाव येथील देसाई वाडी बस स्टॉपजवळ नशेत त्यासोबत झालेल्या वादात दगडाने त्याचे डोके ठेचून त्याची हत्या केली. आरोपी गुन्हा घडल्यानंतर घर सोडून पळून गेला होता. दोन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तो पुन्हा घरी परतायच्या बेतात होता. मात्र त्यापूर्वीच हत्येच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना तपासलेले सीसीटीव्ही फूटेज व कामाला लागलेल्या यंत्रणेने आरोपीचा मागोवा घेतला वा त्याला अटक करण्यात यश मिळविले आहे.
वरात घेऊन आलास तर, मांडवातून मृतदेह...; नवरदेवाला धमकी अन् मग एकच थरार
पोलिसांना हा आरोपी कोरोना काळात कारागृहातून सुटल्याची माहिती मिळत असून ते याबाबत अधिक तपास करीत आहेत. हा सिरीयल किलर जामिनावर सुटला आहे की त्याला हजर राहण्याचे आदेश आहेत या सर्व प्रकाराचा आम्ही तपास करीत असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली.
चोर म्हणून हिणवलं! १९ वर्षांच्या मुलीने बदला घेतला, चुलत भावाला संपवले
सिरीयल किलर कांद्या याला बॉलिवूड च्या रमन राघव चित्रपटात दाखवलेल्या सिरीयल किलर म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण त्याने आतापर्यंत केलेल्या हत्या या नशेत दगडाने ठेचून व एका विकृत पद्धतीने केल्याची माहिती समोर येत आहे. अशा आरोपीला समाजात बाहेर ठेवणं धोकादायक असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी. याच शिवाय त्याला जामीनही मिळू नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.