Shocking News : राजस्थानमधील (Rajasthan) कोटा (Kota) येथे रविवारी नीटची (NEET) तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटना अवघ्या चार तासांत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर यावर्षी कोटामध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22 झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये लातूरमधील (Latur) एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यानंतर कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंग इन्स्टिट्यूटला रविवारी परीक्षा न घेण्याच्या सूचना केल्या होत्या. असे असतानाही परीक्षा घेतल्या जात असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविष्कार संभाजी कासले (17) याने दुपारी 3.15 च्या सुमारास जवाहरनगर येथील कोचिंग सेंटर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. परीक्षा दिल्यानंतर त्याने हे पाऊल उचलले आहे. कोचिंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी अविष्कार रुग्णालयात नेले होते. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. एका फुटेजमध्ये विद्यार्थी पाचव्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर धावताना दिसत आहे. दुसऱ्या फुटेजमध्ये तो उडी मारल्यानंतर पडताना दिसत आहे.
"ही घटना रविवारी दुपारी 3.09 वाजता घडली. लातूर येथील अविष्कार कासलेने कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कोटा येथील तलवंडी भागात हा विद्यार्थी तीन वर्षांपासून राहत होता. तो येथे नीटची तयारी करत होता. त्याची आजीही त्याच्यासोबत दीड वर्षांपासून राहत होती. रविवारी तो रस्ता क्रमांक एक येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षेला देण्यासाठी आला होता," अशी माहिती पोलीस उपअधीक्षक धरमवीर सिंह यांनी दिली.
कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्याने वर्गात बसूनच परीक्षा दिली होती. परीक्षा संपताच तो बाहेर आला आणि बाल्कनीतून खाली उडी मारली. तो सहाव्या मजल्यावरून सुमारे 70 फूट खाली पडला. त्यांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर जखमा झाल्या. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली, असे पोलीस उपअधीक्षक धरमवीर सिंह यांनी सांगितले. विज्ञाननगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मृतदेह एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. सध्या अविष्कारच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध सुरू आहे.
बिहारच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
बिहारच्या रोहतास जिल्ह्यात राहणारा आदर्श राज गेल्या एक वर्षापासून कोटा येथील कोचिंग सेंटरमध्ये परीक्षेची तयारी करत होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या बहिणीसह तो कोटा येथे एका घरात राहत होता. चार तासांच्या अंतरांनी दोन्ही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.