'शिवसेनेने राणेंचे विसर्जन कधीचं केलंय, आता कणकवलीतूनही त्यांना संपवू'

नारायण राणेंवर डागली तोफ   

Updated: Oct 13, 2019, 12:54 PM IST
'शिवसेनेने राणेंचे विसर्जन कधीचं केलंय, आता कणकवलीतूनही त्यांना संपवू' title=

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच आता विविध मतदार संघांतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांपासून बंडखोरांपर्यंत सर्वजण एकमेकांवर टीका करु पाहत आहेत. यातच आता शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर तोफ डागली आहे. 

माझं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होत नाही या राणेंच्या वक्तव्यावर निशाणा साधत, राणेंच्या नावाची दखल घेणं आम्हाला गरजेचं नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. 'नारायण राणे यांच्या नावाचं विसर्जन शिवसेनेने या अगोदरच केलेलं आहे त्यामुळे राणेंच्या नावाची दखल घेणे आम्हाला गरजेचं नाही', असं ते म्हणाले. राजकारणातील विटाळेलं नाव घेऊन स्वतः अपशकुन आणण्याची शिवसेनेची मुळीच इच्छा नाही, असं म्हणत त्यांनी सूचक विधान केलं. 

राणेंच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असं म्हणत त्यांच्याविषयी फार काही बोलण्याची इच्छा नाही अशा थेट शब्दांत राऊत यांनी आपली भूमिका मांडली. आगामी निवडणुकांमध्ये राणेंच्या वाट्यालाल नेमकं काय येणार याचा अंदाजही त्यांनी वर्तवला. 'नारायण राणे हे प्रकरण संपलेलं आहे आणि या विधानसभा निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघात आम्ही नारायण राणे प्रकरणाला पूर्णविराम देणार आहोत', असं ते म्हणाले. 

भाजपाची राणेंविषयी असणारी भूमिका पाहता त्यांनी भाजपा हायजॅक केला का?, असं विचारलं असता, 'भाजप आणि राणे यांच्यात जो काही समन्वय झालेला आहे तो त्याना फलदायी ठरेल असे वाटत नाही राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षाला राणेंनी अधोगतीकडे नेलं आहे तिच परिस्थिती सिंधुदुर्गमधील भाजपा पदाधिकाऱ्यांना अनुभवायला येईल', असं राऊत म्हणाले.