मुंबई : आमचे भाजपातील मित्र रोज तारखा देत आहेत, रोज रंग उधळत आहेत. ते नकली रंग आहेत, अशा नकली रंगांवर केंद्र सरकारची बंदी आहे. त्यामुळे काल त्यांना पवार साहेब यांनी उत्तर दिलंय. काही झाले तरी ते महाराष्ट्रात पुन्हा येणार नाहीत, असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, घाबरू नका पुन्हा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला येऊ देणार नाही. हे त्यांचे विधान केवळ राष्ट्रवादी पक्षासाठी नाही तर पूर्ण महाविकास आघाडी पक्षासाठी त्यांनी मांडलेली भूमिका आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाला वाटत असेल की केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार, नेते यांचे मनोबल ते खाली आणण्याचा प्रयत्न करणार असतील तर ते चुकीचे आहे. आपल्या दंडात ताकद आहे असे त्यांना वाटते, पण तसे अजिबात नाही. कारण ते समोरुन नाही तर मागून वार करतात. राजकारणात असे पाठीमागचे हल्लेदेखील पचवायचे असतात, जे आम्ही पचवतो, असे राऊत म्हणाले.
शिवसेना मोठा पक्ष आहे आणि त्यांना शिवसेनेचे आव्हान आहे. ज्याचे आव्हान आहे त्याच्याविरोधात बोंबा मारल्या जातात. या सरकारला अडीच वर्ष झाली आणि अजून अडीच वर्षे जातील. त्यानंतर पुन्हा आम्ही निवडून येणार आहोत. होळी वर्षातून एकदा येते पण यांचा तर रोजच शिमगा सुरू असतो. आम्ही जर यांचा शिमगा करायला सुरुवात केला तर महाराष्ट्रात खूप खड्डे खणलेले आहेत. त्या खड्ड्यात कोण पडेल आणि कोणाला ढकलले जाईल हे तुम्हाला हळूहळू दिसेल, असा टोला त्यांनी लगावला.
आम्ही राजकीय धुळवड कधीच खेळत नाही. मात्र, सध्या महाराष्ट्रात रोजच धुळवड सुरू आहे, ती थांबली पाहिजे. वर्षातून एकदा अशी धुळवड खेळायला काहीच हरकत नाही. 'बुरा न मानो होली है,' काही ठिकाणी शिमगा आणि होळीमध्ये फरक असतो. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिमग्याचा खरा अर्थ समजून घ्यावा आणि त्या पद्धतीचे रंग त्यांनी खेळावेत. महाराष्ट्राचा जो रंग आहे, हा स्वाभिमानाचा आणि ऐक्याचा रंग आहे, तो त्यांनी समजून घ्यावा, अशी टीकाही राऊत यांनी भाजपवर केलीय.
फडणवीसांना गोवा काय ते कळेल
देवेंद्र फडणवीस गोवा जिंकून आल्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. पण, गोवा काय आहे ते त्यांना लवकरच कळेल. कारण, गोवा पोर्तुगीज यांना कळला नव्हता आणि इंग्रजांना देखील कळला नव्हता. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनाही अनेक वर्ष गोवा कळला नाही. त्यामुळे लवकरच मित्र देवेंद्र फडणवीस यांनाही गोवा काय आहे ते कळेल. गोवा जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल, पण त्यांनी प्रयत्न करावे. राजकीय कार्यात स्वतःला वाहून घ्यावे.
हे तर आमचे सौजन्य
विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय हा काही जटिल प्रश्न नाही. पण तरी तो जटिल करण्यात आलाय. हा विषय इतका जटिल होऊ नये, कारण तो घटनात्मक विषय आहे. घटनेनुसार निवडणुका व्हायला पाहिजेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शिफारस केलेली आहे, खरं म्हणजे कायद्याने राज्यपालांना विचारू नये, त्यांना फक्त कळवायचे असते. पण, आमच्यात सौजन्य आहे की आम्ही त्यांना विचारत आहोत.