अंबरनाथ : रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने केलेल्या भाडेवाढीला आरटीओने लगाम घातलाय. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर आरटीओने नवीन भाडे दरपत्रक जाहीर केले असून त्यात रिक्षाचे भाडे कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच्या भाड्याचा विचार करता रिक्षाचे भाडे अर्ध्यावर आले आहे. त्यामुळे प्रवासीवर्गातून याचे स्वागत करण्यात येत आहे. तर आरटीओने दणका दिल्याने रिक्षा चालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
अंबरनाथ शहरात रिक्षाचालकांनी काही दिवसांपूर्वीच शेअर रिक्षाचालकांनी भाडं पाच रुपयांनी वाढवले होते. तर मीटरप्रमाणे वाहतूक न करता थेट भाडे पद्धत वापरली जात होती. याविरोधात नागरिकांनी आरटीओकडे तक्रारी केल्यानंतर आरटीओने अंबरनाथ शहरात सर्व्हे करून रिक्षांचे भाडे ठरवून दिले आहे. ज्यात शेअर रिक्षाचे किमान भाडं १५ रुपयांवरून थेट ८ रुपये करण्यात आले आहे. तर थेट वाहतूक मीटरप्रमाणेच करण्याची सक्तीही करण्यात आली आहे.
या सगळ्यानंतर रिक्षाचालकांनी महागाईचे कारण देत या निर्णयाला विरोध केलाय. रिक्षांच्या वाढलेल्या किंमती, इन्शुरन्स, मेंटेनन्स, गॅसचे भाव पाहता आरटीओने दिलेले दर हे परवडण्यासारखे नसल्याची भूमिका रिक्षाचालकांनी घेतली आहे. तसेच आरटीओने आमचं म्हणणे ऐकलेले नाही, तर उद्या शेतकऱ्यांप्रमाणेच रिक्षाचालकांवरही आत्महत्येची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिक्षाचालकांनी दिलाय.
तर दुसरीकडे प्रवाशांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले असून रिक्षाचालकांनी आरटीओच्या नियमानुसारच भाडेआकारणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र या सगळ्यात येत्या काळात रिक्षाचालक विरुद्ध प्रवासी आणि आरटीओ असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.