मुंबई : यावर्षी ऑगस्ट महिन्यात २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. गेल्या ४४ वर्षातला ऑगस्ट महिन्यातला हा सर्वाधिक पाऊस आहे असं हवामान विभागाने म्हटले आहे. याआधी १९७६मध्ये देशात ऑगस्ट महिन्यात तब्बल २८.४ टक्के अधिक पाऊस झाला होता. देशात सध्या सरासरीच्या ९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. सिक्कीम, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, गोवा या राज्यात अधिक पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातल्या धरणातला पाणीसाठाही अधिक असल्याचं केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात गेले दोन दिवसा चांगला पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरात चांगला पाऊस कोसळत आहे. नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पालघर, वसई याठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अधूनमधून पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला आहे.
मागील तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असल्यानं मेळघाटात सध्या दिवसभर धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तर सातपुडा पर्वत रांगा ही आता हिरवाईनं नटलेल्या आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील पावसाची रिमझिम सुरू आहे. अशातच मेळघाटात सुद्धा दमदार पाऊस असल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.पावसाळ्यात दरवर्षी हजारो पर्यटक हे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मेळघाटात येत असतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे मेळघाटातील पर्यटन पूर्णपणे बंद असल्यानं पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
कालपासून सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि पेंच जलाशयातील पाण्याच्या विसर्गामुळे नाग नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील नाथ नगरात पूर स्थिती उदभवली आहे. तारसा येथील सांड नदीवरील पूल पूर्ण पाण्याखाली असून कन्हान अरोली रस्ताही बंद झालाय. तर शिवाडोली बेरडेपार रस्त्यावरील नाल्यावरील पूल वाहून गेलाय.. दरम्यान स्थानिक प्रशासन तेथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
भंडारा जिल्ह्यात पोल्ट्री फार्ममध्ये चार फूट पाणी शिरल्याने ३५०० कोंबड्यांचा मृत्यू झालाय. भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावलीय. अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. पुराच्या पाण्याने शेतीलाही वेढा दिलाय. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द गावातील गोविंद बोन्द्रे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतावरच पोल्ट्री फार्म उभारणी केली होती. मात्र या पावसामुळे वैंनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतामधील पोल्ट्री फार्ममध्ये चार फूट पाणी शिरल्याने ३५०० कोंबड्या मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगतांना दिसत आहेत. जवळपास ३ लाख ५० हजाराच्या जवळपास आर्थिक नुकसान झाल्याने शासनांनी आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.