संतापजनक! मावळमधील डी. वाय. पाटील शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे

आम्ही मुलांना इथे शिकण्यासाठी पाठवत आहोत. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षण देण्याचेच काम केले पाहिजे. आम्ही एवढ्या मोठ्या शाळेत त्यांना पाठवतो आणि मुलींच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पण आता ते कॅमेरे काढून टाकण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया संतप्त पालकांनी दिली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 6, 2023, 11:47 AM IST
संतापजनक! मावळमधील डी. वाय. पाटील शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे title=

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या (Pune News) मावळ तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. तळेगाव आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील शाळेत (DY Patil school) शाळा व्यवस्थापनाकडूनच मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर लवकरात लवकर कारवाई अशी मागणी पालकांनी केली आहे. तर दुसरीकडे हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर काही संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत.

मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी हे डॉ. डी. वाय. पाटील शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. ही नावाजलेली शाळा असल्याने या शाळेत अनेक पालक त्यांच्या मुलांना शाळेत घालण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ही बाब शाळेतील मुलींनी पालकांना सांगितली. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनाला विचारले असता त्यांनी मुख्याध्यापकांनी कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले. हा सगळा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. जोपर्यंत या घटनेबाबत शाळा प्रशासन दोषींवर ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे.

तर दुसरीकडे शाळा प्रशासनाला याबाबत आम्ही विचारले असता शाळा प्रशासनाने मौन बाळगले आहे. त्यामुळे शाळेत केवळ मुलींच्या स्वच्छतागृहातच कॅमेरे का बसविण्यात आले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. डॉ. डी. वाय. पाटील शाळेत मुलींच्या स्वच्छता गृहात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्यानंतर मावळ भाजपकडे पालकांच्या तक्रारी आल्यानंतर मावळ भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तातडीने मावळ गटशिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर गटशिक्षणाधिकारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ समिती नेमून अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत.

"सकाळीच या सर्व प्रकाराचा व्हिडीओ पाहायला मिळाला आहे. याबाबत चौकशी करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. मी यासंदर्भात केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांना त्या शाळेत पाठवलं. मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये दोन महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यानंतर पालकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. पण पालकांनी विविध तक्रारी केल्या आहेत. पोलीस प्रशासनाला पालकांनी लेखी तक्रार दिली असून या प्रकारामध्ये दोषी आढल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे," अशी माहिती मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली.

दरम्यान, मुलींच्या स्वच्छता गृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मुख्याध्यापक आणि संस्थेवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.