नाशिक : नाशिकमध्ये भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. आवक घटल्याने पालेभाज्यांचे दर दुप्पट, तर फळभाज्यांचे दर किलोमागे १० रुपयांनी वाढले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
मुंबईची परसबाग असलेल्या नाशिक जिल्ह्यात आवक मंदावल्याने पालेभाज्यांसह फळभाज्याही महागल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. काही फळभाज्यांचेही दर किलोमागे १० रुपयांनी वाढले आहेत. गेल्या आठवड्यापासून आवक मंदावल्याने भाजीपाला कडाडला असून आगामी काळात भाजीपाल्याचे दर आणखी कडाडणार आहेत.
मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, कांदापात या पालेभाज्यांचे दर दुप्टीवर गेले आहेत. गेल्या आठवड्यात फळभाज्यांचे किलोचे दर भेंडी ८० रुपये, गवार १२०, वाटाणा-टोमॅटो २०, काकडी ३०, कारले ६०, गिलके-दोडके-मिरची ६०, वाल २०, वांगे-ढोबळी मिरची ४०, शेवगा ६०, बटाटे १५, कोबी २०, फ्लॉवर ३० रूपये गड्डा, कोथिंबीसर जुडीचा दर १३ रूपयांवरून २१ रूपयांवर पोहचला आहे. बाजार समितीच्या तुलनेत किरकोळ बाजारातील या भाज्यांचे भाव किलोमागे १० ते १५ रुपयांनी जास्त आहेत. याचा परिणाम मुंबई, मराठवाडा आणि गुजरातमध्येही दर वाढण्यावर होणार आहे. भाज्यांची ही दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.