Sharad Pawar Video : राज्याच्या राजकाराणाला वेळोवेळी वेगळी दिशा देणारं आणि सत्तास्थापना असो किंवा विरोधकांचा डाव उधळून लावणं असो, चर्चेत येणारं एक नाव म्हणजे शरद पवार. अनेक दशकं राज्याच्या राजकारणात आणि जनमानसाच्या सेवेसाठी समाजकारणात सक्रिय असणाऱ्या या नेत्यानं कायम अनेकांपुढं आदर्श प्रस्थापित केला. विरोधकांनीही त्यांच्या चाणक्यनितीला वेळेवेळी सलाम ठोकला.
नुकताच आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचा निर्णय पवारांनी सुनावला आणि एका क्षणात त्यांच्या या निर्णयानं अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. साहेब नाहीत तर आम्हीही नाही... असं म्हणत दिग्गज नेत्यांनीही पक्षाची जबाबदारी दूर लोटली आणि सरतेशेवटी शरद पवार यांना त्यांचा राजीनावा मागे घेतला. भाकरी फिरवायला निघालेल्या शरद पवारांच्या एका खेळीनं पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात दोन दिवसांतच असंख्य घडामोडी घडल्या. कोण रडलं, कोणी दरडावलं, कोणी मौन पाळलं... चर्चेत मात्र एकच नाव राहिलं, ते म्हणजे शरद पवार यांचं.
हेच शरद पवार मात्र त्यांच्या नियमीत सभा, भेटीगाठी, ठरलेली कामं पूर्ण करताना आणि दिलेला शब्द बजावताना दिसले. तुम्हाला 2019 मधली विधानसभा निवडणुकांदरम्यानची पवारांची ती भर पावसातली सभा आठवतेय का? साताऱ्यातील त्या सभेत पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता आणि शरद पवारही त्याच्यापुढं नमताना दिसले नाहीत. तेव्हापासूनच त्यांचं आणि पावसाचं समीकरण सुपरहिट ठरलं. याचीच पुनरावृत्ती हल्लीकडेच झाल्याचं पाहायला मिळालं.
सोलापुरात शरद पवारांना पुन्हा एकदा मुसळधार पावसानं गाठलं. इथं कोणतीही सभा नव्हती किंवा कोणताही मेळावाही नव्हता. शरद पवार इथं एका लग्नसमारंभासाठी आले होते. सोलापूरचे माजी महापौर मनोहरपंत सपाटे यांच्या कुटुंबातील एका विवाहसोहळ्यासाठी त्यांनी हजेरी लावली होती.
शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या विवाहसोहळ्यासाठी पवार आले आणि पावसानंही हजेरी लावली. पण, त्यावेळी माघारी न फिरता पावसात भिजतच वे वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले. बस्स.... मग काय? उपस्थितांनी या नेत्याचा उत्साह पाहून एकच कल्ला करण्यास सुरुवात केली. सोशल मीजियावल या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिथंही नेटकऱ्यांनी या 82 वर्षीय तरुण नेत्याला सलाम केला.