सटाणा : आंटी म्हटलं की अनेक महिलांना राग येतो. मग ती महिला कितीही वयस्कर हा असेना आपल्याला आंटी म्हटलेलं महिलांना आवडत नाही. काही महिला तर इतक्या संतप्त होतात की त्या काय करतील याचा नेम नाही. पण मामी म्हटलं म्हणून राग आला असं कधी तुम्ही ऐकलं आहे का.
पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. एका व्यक्तीने एका महिलेला मामी म्हटलं, या कारणाने त्या व्यक्तीची चांगलीच धुलाई करण्यात आली.
नेमकी घटना काय?
ही घटना आहे बागलाण तालुक्यातल्या वटार इथली. अशोक खैरनार हे कांदे व्यावसायिक आहेत. बुधवारी ते उमराणा मार्केटमध्ये कांदे विकण्यासाठी गेले होते. त्यानंतर घरी परतत असताना भाजी घेण्यासाठी ते वटार गावच्या आठवडे बाजार गेले. एका भाजीच्या दुकानात ते भाजी विकत घेण्यासाठी थांबले. भाजीचा भाव विचारण्यासाठी त्यांनी दुकानातील महिलेला ओ मामी अशी हाक मारली.
मामी हाक मारल्याने महिलेच्या पतीला प्रचंड राग आला. माझ्या पत्नीला मामी म्हणायचे नाही असे बोलून भाजी विक्रेत्याने अशोक खैरनार यांना आधी शिवीगाळ केली. पण इतक्यावरच तो शांत बसले नाहीत. त्याने वजनाच्या लोखंडी मापाने अशोक खैरनार यांना मारहाण केली. या मारहाणीत अशोक खैरनार जखमी झाले.
याबाबत अशोक खैरनार यांनी सटाणा पोलीस ठाण्यात संजय खैरनार आणि दीपक खैरनार या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.