सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या एका युवकाने तब्बल 23 वेळा स्पर्धा परीक्षेच्या पूर्व परीक्षेत यश मिळवले आहे. मुख्य परीक्षेत यश मिळाले नाही म्हणून खचून न जाता त्याने जिद्दीने प्रयत्न सुरूच ठेवले आणि चोविसाव्या प्रयत्नात त्याला एक नव्हे तर दोन पदांमध्ये यश मिळालं आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील माटाळा इथल्या सागर शिंदेने हे यश मिळवलेय.
एमपीएससीच्या परीक्षेत तब्बल 23 वेळा अपयश आले तरी या बहाद्दराने प्रयत्न करणे काही सोडलं नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही सागरने सात वर्षे संघर्षमय स्थितीत अभ्यास केला. त्यानंतर 24 व्या प्रयत्नात त्याने मंत्रालयातील लिपिक आणि कर सहायक अधिकारी अशा दोन्ही पदांसाठी तो पात्र ठरलाय. अपयश आल्यानंतर टोकाचे निर्णय घेणाऱ्या युवकांसाठी सागरचा हा संघर्ष प्रेरणादायी आहे.
"एमपीएससीच्या निकालामध्ये कर सहाय्यक अधिकारी म्हणून माझी निवड झाली आहे. तब्बल 23 वेळी पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झालो होतो. 24 व्या वेळी मी परीक्षा पास झालो. तुमच्या रेफरन्स बुक चांगल्या असतील तर तुम्हाला हमखास यश मिळते," असे सागर शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, गडचिरोलीच्या शुभम कोमरेवारने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय परीक्षेत तो राज्यातून अव्वल ठरला आहे. त्याच्या गडचिरोली जिल्ह्यात पहिला आल्यानंतर कुटुंबीय व मित्रपरिवाराने शहरात त्याची चक्क वाजत -गाजत मिरवणूक काढली. शुभमचे यश मागास - संवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना प्रेरणादायी ठरणार आहे.
"एमपीएससीमार्फत सहाय्यक मत्स विकास व्यवसाय अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या मी प्रथम क्रमांक मिळवला आहे. मला सुद्धा अधिकारं व्हावं अशी अपेक्षा होती. अधिकारी होऊन मला संधी मिळेल ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. याचे पूर्ण श्रेय मी माझे आई वडील आणि माझ्या मोठ्या भावाला देतो. माझे शिक्षक, मित्र यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला. मला संधी गवसली आहे," असे एमपीएससी टॉपर शुभम कोमरेवार याने म्हटलं.