योगेश खरे, जळगाव, झी 24 तास : अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. दर महिन्याला घोटाळेबाज या शिक्षण घोटाळ्यातून सरकारी तिजोरीवर लाखोंचा दरोडा टाकतायत. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे हे घोटाळे समोर येतात सुद्धा मात्र शिक्षण विभागातील अधिका-यांच्या भ्रष्ट कारभारामुळे घोटाळे समोर येत असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. तर दुस-या बाजूला पगाराचा बोजा वाढतो म्हणून गेल्या तीन दशकांपासून शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागतंय. हे घोटाळेबाज कोण आहेत. त्यांची घोटाळा करण्याची मोडस ऑपरेंडी काय आहे. अमळनेर आणि जळगावमधल्या शाळांमधल्या घोटाळ्यामागचा चेहरा शोधण्याचा झी २४ तासच्या टीमने प्रयत्न केला. त्यावेळेस समोर आलं धक्कादायक वास्तव.
2012 मध्ये सरकारने शिक्षक भरती बंद केली. मात्र त्याआधीच्या शाळा आणि त्यातल्या शिक्षकांना आजही मान्यता दिली जाते. याचाच फायदा उचलला तो घोटाळेबाजांनी. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असं गोंडस लेबल लावून कोर्टात जातात. त्यानंतर शिक्षण विभागाला भरतीचे आदेश दिले जातात. शिक्षकांची जुनी भरती दाखवत भरतीची मान्यता मिळवली जाते असे गैरप्रकार केले जात असल्याचा आरोप आहे.
भरती बंद झाल्यानंतर शासन सध्या शाळा चालवण्यासाठी कुठलाही खर्च देत नाही. तसंच पगारही शिक्षकांना मिळत नसल्याने लाखोंचा मिळणारा मलिदा शिक्षण संस्था चालकांना बंद झाला. या सर्व व्यवहारात शिक्षण विभागातील बेकायदेशीर कामे करणारे एजंट हुशार झाले. ग्रामीण भागातील शाळा शोधून त्यांनी स्वतः काही शाळा चालवण्यासाठी नावाने 'हस्तांतरित' करून घेतल्या.
शाळांची बनावट विद्यार्थी संख्या दाखवून शिक्षक भरतीच्या मान्यता मिळवल्याचा आरोप आहे
जुने मस्टर, जुने नियुक्तीचे आदेश दाखवत शिक्षकांच्या जागा मंजूर केल्याचाही आरोप आहे
बनावट बिंदू नामावलीतून 2012 आधीच्या शिक्षकांच्या जागा मंजूर केल्याचाही आरोप आहे
पात्रता नसतानाही नोकरी लावण्यासाठी शिक्षकांकडून सरासरी पन्नास लाखांची वसुली केली जात असल्याचाही आरोप आहे
शिक्षकांच्या पगारातला लाखोंचा फरक परस्पर वर्ग करुन घ्यायचा अशी मोडस ऑपरेंडी असल्याचा आरोप आहे
एकेका शिक्षकामागे एजंट्सकडून महिन्याला कोटींची कमाई होत असल्याचा आरोप आहे.
11 वर्षात जळगाव जिल्ह्यात 4000 शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याचा आरोप आहे.
जिल्ह्यात 4 हजार शिक्षक आणि प्रत्येकाचा पगार 1.5 लाख पकडल्यास
दरमहा अंदाजे 60 कोटींचा भुर्दंड सरकारी तिजोरीवर पडतोय
राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि सरासरी 500 शिक्षक भरती झाल्याचं पकडल्यास
एका जिल्ह्यात 60 कोटी तर 36 जिल्ह्यांमधल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचा किती भुर्दंड बसत असेल या आकड्याची कल्पनाही करवत नाही.
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा घोटाळा सरकारी तिजोरीवर कोट्यवधींचा भार टाकतो आहे.