'तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही' कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवार रस्त्यावर

Sharad Pawar on Onion : कांदा निर्यातबंदी तातडीने उठवा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. कांद्याच्या प्रश्नाप्रकरणी शरद पवार यांनी रस्त्यावर उतरत आंदोल केलं, आता उद्या पवार दिल्लीला जाणार असून संसदेत कांदा उत्पादकांची व्यथा मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राजीव कासले | Updated: Dec 11, 2023, 02:06 PM IST
'तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही' कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवार रस्त्यावर title=

Sharad Pawar on Onion : कांदा निर्यातबंदी तातडीने उठवण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे.. कांदा निर्यातबंदीविरोधात (Onion Export Ban) आक्रमक झालेले शरद पवार (Sharad Pawar) स्वत: मैदानात उतरले होते. मुंबई-आग्रा रोडवर चांदवडमध्ये (chandwad) शरद पवारांनी शेतकऱ्यांसह रास्ता रोको केला. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले तर दंगा कशाला? असा सवालही शरद पवारांनी विचारलाय कादांप्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार उद्या दिल्लीला जाणार आहेत. आजच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकारची झोप उडली आहे, रास्ता रोको केल्याशिवाय या दिल्लीला कळत नाही. रास्तो रोकोतून केंद्र सरकारला संदेश दिला आहे आता उद्या दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडणार असं शरद पपवार यांनी म्हटंलय. 

कांदाप्रश्ना शरद पवार यांनी रास्ता रोको आंदोल केल्यानंतर पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आपण कृषी मंत्री असताना कांद्याची किंमत कमी होऊ देणार नाही असं स्पष्ट केलं होतं, पण आताचं सरकार ते करु शकत नाही, सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही अशी टीका शरद पवार यांनी केली. कांद्याचे दर वाढताच निर्यात बंदी केली जाते, सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार आहे की नाही, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, शरद पवारांच्या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. 

विरोधकांची आक्रमक भूमिका
एकीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत घोषणा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. मात्र दुसरीकडे विरोधकांनी मात्र यावर आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.. कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलीय.. कांद्याची माळ गळ्यात घालत विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर कांदा निर्यात बंदी हा सरकारचा मुर्खपणा असल्याचं म्हणत राजू शेट्टींनी सरकारवर टीका केलीये. कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला असून सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय... 

कांदाप्रश्नी दिल्लीत महत्त्वाची बैठक
कांदा प्रश्नावर दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही या बैठकीला जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत आज किंवा उद्या बैठक घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिलीय. केंद्राने घातलेली कांदा निर्यात बंदी तसंच इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी यावर या बैठकीत चर्चा होण्य़ाची शक्यता आहे.. त्यामुळे या बैठकीत मोठा निर्णय होतो का? याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.

कांद्याचे दर कोसळले
कांदा निर्यातबंदीवरून रणकंदन माजलेलं असताना सोलापुरात कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर कोसळले. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव उद्या बंद राहणारंय. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कांद्याची आवक झालीय.  बाजार समितीत आज सुमारे 1 हजार ते 1200 गाडी कांद्याची आवक झाली. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलमागे 2800 रूपयांचा भाव मिळाला. कालपर्यंत याच कांद्याला 4 हजार रूपयांपर्यंत भाव होता. कांद्याची आवक वाढल्यानं उद्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. 

कांदा निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आज नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर सरासरी 1500 रुपयांनी उतरलेयत.. तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने जाणारा कांदा आज अडीच हजार रुपये दराने विकला जातोय. सध्या उत्पादित होणारा लाल कांदा जास्त टिकू शकत नसल्याने शेतकऱ्याला तातडीने विकणे भाग असते. त्यामुळे मिळेल तो भाव पदरात पाडून घेण्याचा कल शेतकऱ्यांचा दिसून आलाय