राज्यात पावसासाठी पोषक वातावरण; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा

Maharashtra Rain : राज्यातू पावसानं दडी मारली की काय, या प्रश्नाचं उत्तर होकारामध्ये येण्याआधीच पाऊस महाराष्ट्रात पुनरागमन करताना दिसत आहे. सध्या पावसासाठीचं पोषक वातावरणही पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 14, 2023, 07:11 AM IST
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा  title=
Maharashtra Rain state to vitness good amount of rainfall in upcoming hours

Maharashtra Rain : यंदाच्या वर्षीचा मान्सून तुलनेनं काहीसा उशिरानं महाराष्ट्रात दाखल झाला. किंबहुना दाखल होऊनही मान्सूननं संपूर्ण राज्याचा ताबा घ्यायलाही चांगलाच वेळ लावला. जुलै महिन्यात त्याचा वेग वाढला आणि पाहता पाहता तो महिना पावसानं खऱ्या अर्थानं गाजवला. असं असतानाच ऑगस्ट मात्र यासाठी अपवाद ठरतोय. कारण, ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच राज्यात मान्सून बेताचा असल्याचं पाहायला मिळत आहे. बहुतांश भागात उन्हाळ्यात जाणवतो तसा उष्णचतेचा दाहसुद्धा जाणवू लागला आहे. पण, आता मात्र हे चित्र बदलेल. कारण, महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं स्पष्ट होत आहे. 

पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही भागांमध्ये दमट वातारणामुळं उष्णतेचा दाह अधिक जाणवेल. पण, ठाणे, रत्नागिरी, रायगडसह पालघरमध्येही हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे पट्ट्यामध्ये बहुतांशी वातावरण ढगाळ राहणार असून, मधूनच पावसाची सर बरसण्याचा अंदाज आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharastra Politics: शरद पवार भाजपसोबत जाणार? अजित पवारांसोबतच्या 'गुप्त' बैठकीवर म्हणाले...

 

मान्सूननं का घेतला ब्रेक? 

हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावलेला मान्सून त्याच्या पुढील प्रवासासाठीच्या पोषक वातावरणाअभावी ताटकळला. परिणामी राज्यातून पाऊस नाहिसा झाला. पण, आता हाच पाऊस 18 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हंही आहे.  के.एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्टपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

विदर्भातील काही भागात आणि शेजारील आणि शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात शक्यता दिसतेय असंही त्यांनी ट्विट करत सांगितलं. तिथं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाच्या हजेरीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. थोडक्यात ऑगस्ट महिन्याचा शेवट पावसानं होणार हे मात्र नक्की. राज्यातून हरवलेल्या  पावसाचं परतणं शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. कारण, रखडलेली शेतीची कामं आणि अर्थ्यावर बहरलेली शेती आता पुन्हा नव्यानं जग धरणार आहे.