गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : बाबासाहेबांच्या डोक्यात जर मुस्लिम धर्म स्वीकारायचा विचार आला असता तर भारताचे दोन तुकडे करावे लागले असते असं विधान करुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एकच खळबळ उडून दिली आहे. मुस्लिम धर्माबद्दल केलेल्या या वक्तव्यावरुन आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. परभणी येथे काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांनी आयोजित केलेल्या मूर्ती वाटपाच्या कार्यक्रमात केले आहे. त्यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे.
परभणीत सहा फूट उंचीच्या पन्नास बुद्धरूप मूर्तीचे वितरण करण्यात आलं. त्याचसोबत वैश्विक धम्मदेशनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं. धर्मांतराचा विषयावर बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे तुकडे करावे लागले असते, असे विजय वडेट्टीवर म्हणाले.
तर दुसरीकडे मंदिरातील पुजाऱ्यांवर देखील विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले. मंदिरातल्या दानपेट्या काढल्या तर मंदिरांमध्ये पुजारी सुद्धा राहणार नाहीत, ते गायब होतील असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अंबड येथे झालेल्या ओबीसी सभेमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण तापलं होतं. त्यानंतर आता या दोन नवीन वक्तव्यांनी यामध्ये अधिक भर पडणार असल्याचा दिसत आहे.
विजय वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण
या सगळ्या वक्तव्यावर नागपुरात बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "भाषणामध्ये जो मुद्दा मी मांडलेला आहे तो त्यावेळी तिथे अनेक वक्त्यांनी मांडलेला होता. आजच्या परिस्थितीमध्ये जर तसं झालं असतं तर विष पेरण्याचा काम झालं असतं. विष पेरणारे राज्यकर्ते झालेत. दिल्लीत हिंदू मुस्लिम लढवण्याचा काम सुरू आहे. आज काही परिस्थिती असली आजच्या परिस्थितीनुसार मी ते वक्तव्य केलेले आहे. आज ही परिस्थिती राज्यकर्त्यांच्या पुढे आली असती हा त्याचा अर्थ होता. तो कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या विषयाला धरून होता. बाबासाहेबांनी धर्मांतर करताना बौद्ध धर्माचा स्वीकार केला. जर त्यावेळेस चुकीची भूमिका घेतली असती तर, आज जे विष पेरल जात आहे, दोन धर्मात आग लावली जात आहे तर आज या देशाचे दोन तुकडे झाले असते, असे त्या बोलण्याचा अर्थ होता. त्याचा अर्थ चुकीचा नव्हता. त्यामुळे चुकीचा अर्थ काढू नका," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.