मोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

DGP Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. शुक्लांवर फोन टॅपिंग प्रकरणी आरोप आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Nov 4, 2024, 12:26 PM IST
मोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली  title=
maharashtra Director General of Police Rashmi Shukla Transfer before maharashtra assembly election

DGP Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. शुक्लांवर फोन टॅपिंग प्रकरणी आरोप आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याच बदलीसाठी काँग्रेस पक्ष आग्रही होता. विधानसभा निवडणूक मतदानाच्या 15 दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आलीय. काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेक. त्याशिवाय त्यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपण्याचा आदेशही आयोगाने दिलाय. 

दरम्यान या आदेशानंतर मुख्य सचिवांनीदेखील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनला नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्या गुरुवारी राज्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर 28 पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या होत्या. काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी आयोगाला पत्र पाठवलं होतं. रश्मी शुक्ला पदावर असताना राज्यात निष्पक्ष निवडणूक होणे अवघड आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. 

रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी पूर्ण झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसंच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामं त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.

फोन टॅपिंग प्रकरणात नाव आलं होतं चर्चेत

रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात, तर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

फोन टॅपिंग प्रकरणाचा घटनाक्रम

19 ऑगस्ट 2022 रोजी सीबीआयच्या विशेष कार्य शाखेने भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या कलम 30, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 43 (बी), 66 आणि अधिकृत गुप्तता कायद्याच्या कलम 5 अंतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
26 मार्च 2021 बीकेसी सायबर पोलिसांनी अधिकृत गुपित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आणि लीकची चौकशी सुरु केली. 
मार्च 2022 मध्ये सायबर पोलिसांनी फडणवीस यांचा जबाब नोंदवला. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 24 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
मे 2022 : तपास निरीक्षक संजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा पोलिस ठाण्याकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं
22 जुलै 2022: राज्य सरकारने कुलाबा पोलिसांकडून प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केलं. 
मे 2023: सीबीआयने दंडाधिकार्‍यांसमोर क्लोजर रिपोर्ट सादर केला. एफआयआर दाखल करणाऱ्या तक्रारदाराला एसआयडीने ना-हरकत दिली. 
4 ऑगस्ट 2023: क्लोजर रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाने गृह सचिवांना डिजिटल पुरावे  सुपूर्द करण्याचे निर्देश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले होते. त्या निर्देशांविरुद्ध दाखल करण्यात आलेली पुर्ननिरीक्षण याचिका फेटाळली.
21 ऑगस्ट 2023: अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयवंत सी यादव यांनी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला.
8 सप्टेंबर 2023 : रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील मुंबई आणि पुण्यातील गुन्हे रद्द

रश्मी शुक्ला कोण आहेत? 

रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी 
महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्‍यांपैकी एक 
त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली
पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केलं

आता शुक्ला यांच्या बदलीनंतर त्यांच्याकडे नेमका कोणता विभाग सोपवला जाणार तसंच राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी कोणावर सोपवली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.