85+85+85 = 270... महाविकासआघाडीचे बिघडलेले गणित

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत 85+85+85 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. यावरुन  महाविकासआघाडीत वाद निर्माण झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 24, 2024, 11:36 PM IST
 85+85+85 = 270... महाविकासआघाडीचे बिघडलेले गणित title=

Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडीचं 85 अधिक 85 अधिक 85 बरोबर 270 हे गणित राज्यात चर्चेचा विषय झालाय. तीन पक्षांच्या जागांची गोळाबेरीज 255 होत असताना 270 जागांचं गणित मविआनं मांडलं. जागावाटपाचा हा फॉर्म्युला मांडणारे जयंत पाटील, संजय राऊत आणि नाना पटोलेंवर सत्ताधारी महायुतीनं टीकेचा भडीमार केलाय.

महाविकास आघाडीच्या निवडणुकीचं गणित ठरलं असलं तरी त्यांची बेरीज वजाबाकी आणि मांडणी मात्र नेत्यांना अजूनही जमलेली नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं गणित मांडताना मविआचा नेता काही ना काही चूक करत होता. कधी संजय राऊत जयंत पाटलांना आकडेमोड विचारत होते तर कधी संजय राऊत नाना पटोलेंच्या कानात आकडे समजावून सांगत होते. संजय राऊतांना जेव्हा 85+85+85 ची बेरीज 270 कशी हे विचारल्यावर संजय राऊतांचा पारा चढलेला दिसला.

 महाविकास आघाडीच्या चुकलेल्या गणितावर महायुतीचे नेते बोलणार नाहीत असं होणार नाही. 85+85+85 ची बेरीज 270 होते हे गणित जयंत पाटलांचं आहे का असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी लगावलाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गणिताचा पार शोभा झाली. पण या बिघडलेल्या गणितावरुन ऐन निवडणुकीत मैत्रीची घडी बिघडू नये याची काळजी नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे. किमान पुढच्या वेळी तरी मविआचे नेते जागावाटपाच्या गणिताचं होमवर्क करुन माध्यमांना सामोरे जातील एवढीच माफक अपेक्षा...