अनिल देशमुखांवर हल्ला, भाजपचा नेता म्हणतो 'ही स्टंटबाजी'

Bjp Reaction On Anil Deshmukh Attack: ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Nov 18, 2024, 10:04 PM IST
अनिल देशमुखांवर हल्ला, भाजपचा नेता म्हणतो 'ही स्टंटबाजी' title=
अनिल देशमुख

Bjp Reaction On Anil Deshmukh Attack: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या घटनेत अनिल देशमुख जखमी झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नरखेड येथील सांगता सभा आटपुन अनिल देशमुख तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगड फेकला.यात अनिल देशमुख यांच्या चार चाकी वाहनाचा समोरचा काच फुटला आणि त्याचे तुकडे आतल्या बाजूला उडाले त्यामुळे अनिल देशमुख जखमी झाल्याचे बोलले जात आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान भाजपच्या गोटातून यावर प्रतिक्रिया आली आहे. 

ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.

भाजपकडून प्रतिक्रिया 

अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा केला जात असला आणि तो हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे असं सांगितलं जात असलं तरी ही स्टंटबाजी असल्यास चा आरोप भाजप नेते आणि काटोल मतदारसंघ निवडणूक प्रमुख अविनाश ठाकरे यांनी केला आहे.  सहानभुती मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

नेमकं काय झालं?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख जी नरखेड येथील सांगता सभा आटपुन काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचा करिता काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. अनिल देशमुख यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांच्या गाडीसमोरील काचेवर एक मोठा दगड पडल्याचा दिसत आहे. अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. माहितीनुसार गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे समोरील काच फुटली आणि त्या काचेचे तुकडे समोर बसलेल्या अनिल देशमुखांच्या डोक्याला लागले. 

सुप्रिया सुळेंची पोस्ट - 

प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.