विशाल कारोळे, झी मीडिया : संभाजीनगरमध्ये राहाणारी मयुरी व्यवहारे ही विद्यार्थिनी मेडिकलला म्हणजेच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (Medical Course) प्रवेशासाठी सध्या तिची धडपड सुरूय. मयुरीला डेंटिस्ट (Dentist) व्हायचंय. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या ओबीसी मुलींना फी माफी देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी यंदाच्या बजेटमध्ये केली. मात्र या योजनेची अमलबजावणी कधी होणार, याबाबतचा तपशीलवार जीआर कधी जाहीर होणार, असे प्रश्न व्यवहारे कुटुंबाला पडलेत.
केवळ मेडिकलच नाही तर अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ अशा विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थिनी आणि पालकांसमोर हीच अडचण आहे. या अभ्यासक्रमांबरोबरच राज्यातील deemd प्रकारात मोडणाऱ्या मेडिकल कॉलेजेसची प्रवेश प्रक्रिया पुढील दोन दिवसात सुरू होणाराय. प्रत्येक अभ्यासक्रम आणि कॉलेजची फी वेगवेगळी असते. कॉलेजची फी किती आहे, याचा विचार करून पालक प्रवेशाचा प्राधान्यक्रम ठरवतात. अर्थमंत्री अजित पवारांनी फीमाफीची घोषणा केली. मात्र अजून जीआर निघालेला नाही.
सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यापाठोपाठ योजनेचा GR निघाला. राज्यातील बहिणींचे लाड पुरवणारं सरकार त्यांच्या भाचींबाबत म्हणजे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींबाबत मात्र काहीशी अन्यायाची भूमिका घेतंय. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार मामा न्याय देतील या भाचींचं उच्च शिक्षणाचं स्वप्न साकार करतील का?