Pankaja Munde Post for Supporters: लोकसभा निवडणुकीत भाजपाला अनेक मतदारसंघांमध्ये धक्कादायक निकालांचा सामना करावा लागला आहे. बीडमधील पंकजा मुंडे यांचा पराभवही भाजपासह त्यांच्या समर्थकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी 7 हजार मतांनी पंकडा मुंडेंचा पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील ऊसतोड कामगाराने आत्महत्या केली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत समर्थकांना आवाहन केलं आहे. मी पराभव स्विकारला आणि पचवला असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.
माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई बापाला दुःख देऊ नका. त्यांच्या जीवाला घोर लावू नका. तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ आहे असं आवाहन पंकजा मुंडे यांनी पोस्टमधून केलं आहे. यावेळी त्यांनी मी 15 जूनपासून आभार दौरा करत आहे. तोपर्यंत सर्वजण प्रतिक्षा करा अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही ...मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे ... मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 9, 2024
"स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे. तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे किती कठीण आहे माझ्यासाठी हे कळतंय का? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव, तुम्हीही पचवा!! अंधारी रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो. तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा," अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली आहे.
15 जून पासून मी आभार दौरा करत आहे ...तो पर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा...
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 9, 2024
बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर व अनेक मुद्द्यांनी गाजून पार पडली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला. विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र, अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासियाची आहे, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी हा संदेश दिला आहे.
'क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै' स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. मात्र, सोशल मीडियावर अजूनही आमच्यासारख्या नेत्यांचे फोटो आणि बनावट व्हिडिओ पोस्ट करून वातावरण दूषित केले जात आहे अत्यंत खालच्या भाषेत राजकीय नेत्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट तसेच जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, की हे आता थांबलं पाहिजे, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.