चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ : मावळ... अर्धा कोकणातल्या रायगड जिल्ह्यात, तर अर्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात (Pune) विभागलेला हा लोकसभा मतदारसंघ. उरणच्या सागरी किनाऱ्यापासून श्रीमंत महापालिका असलेल्या पिंपरी चिंचवडपर्यंत (Pimpri Chinchwad) विखुरलेला हा मावळचा मतदारसंघ. नव्यानं सुरू झालेला शिवडी न्हावाशेवा अटल सेतू इथल्या जनतेसाठी गेम चेंजर ठरणाराय. मात्र इथल्या अनेक समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत.
मावळ... समस्या पुष्कळ
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे मृत्यूचा सापळा बनलाय. एक्स्प्रेस हायवेवरच्या सततच्या ट्रॅफिक जॅमवर अजूनही तोडगा निघालेला नाही. मावळची (Maval Constituency) बंद पडलेली पाईपलाईन योजना पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. देहू रोड आर्मी एरिया वाढल्यानं रेड झोनची हद्द वाढली आहे. अनेक नागरिकांची घरं रेड झोनमध्ये गेली आहेत. सागरी सेतू तसंच नवी मुंबई विमानतळासाठी जमीन अधिग्रहण झालेल्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही न्याय मिळालेला नाही
मावळचं राजकीय गणित
2009 मध्ये शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरेंचा 80 हजारांनी पराभव केला. 2014 मध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी शेकापच्या लक्ष्मण जगतापांना दीड लाखांच्या मताधिक्यानं हरवलं. 2019 मध्ये बारणेंच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मैदानात उतरले. मात्र बारणेंनी अजित पवार पुत्राला तब्बल 2 लाखांनी पराभवाचं पाणी पाजलं. विशेष म्हणजे शिवसेनेचा खासदार इथून निवडून येत असला तरी कर्जत या मतदारसंघात महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. मावळ आणि पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे, पनवेल आणि चिंचवडमध्ये भाजपचे, तर उरणमध्ये अपक्ष महेश बालदी आमदार आहेत
शिवसेना शिंदे गटात असलेल्या श्रीरंग बारणेंना यंदा विजयाची हॅटट्रिक करायचीय. मात्र त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी आणि भाजपकडूनच विरोध होतोय. राष्ट्रवादीकडून आमदार सुनील शेळके, तर भाजपकडून बाळा भेगडे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं समजतंय..
एकीकडं महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे.. तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालंय. निवडणूक जाहीर होण्याआधीच त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी घ्यायला सुरूवात केलीय. अलिकडेच उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघात जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला.
दरम्यान, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा प्रभाव मावळच्या राजकारणावर पडू शकतो. इथं मराठा समाजाचा उमेदवार देण्याच्या हालचाली सकल मराठा समाजानं सुरू केल्याचं समजतंय. तसं झाल्यास महायुती आणि मविआ उमेदवारांचं राजकीय गणित बिघडू शकतं..