EXCLUSIVE: 'आज माघार घेऊन रणांगणातून पळाले, उद्या इतिहासजमा होतील' लक्ष्मण हाकेंची जरांगेवर बोचरी टीका

Laxman Hake Reaction On Manoj Jarange: मनोज जरांगेंनी माघार घेऊन रणांगणातून पळ काढल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

Pravin Dabholkar | Updated: Nov 4, 2024, 06:27 PM IST
EXCLUSIVE: 'आज माघार घेऊन रणांगणातून पळाले, उद्या इतिहासजमा होतील' लक्ष्मण हाकेंची जरांगेवर बोचरी टीका title=
लक्ष्मण हाके

Laxman Hake Reaction On Manoj Jarange: आरक्षण मुद्द्यावरुन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. मनोज जरांगे यानी विधानसभा लढवण्याची घोषणा केली होती. पण उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आली असताना जरांगेंनी माघार घेतली. यावर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येतेय. लक्ष्मण हाके यांनी यावरुन जरांगेवर निशाण साधलाय. 'झी 24 तास'च्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

जरांगेंनी रणांगणातून पळ काढला

मनोज जरांगेंनी माघार घेऊन रणांगणातून पळ काढला. सरकार तुमची बाजू ऐकत नसेल तर जनतेच्या दरबारात जाऊन भूमिकेचे समर्थन मिळवण्याची संधी होती. पण जरांगे कोणाच्या तरी सांगण्यावरुन आंदोलन करतात, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. लोकसभेवेळी महाविकास आघाडीच्या बाजूने सभा घेतल्या. यात महायुतीतले काही लोक आहेत. जरांगेच्या मतांची भीती वाटणाऱ्यांना ओबीसी, व्हीजीएनटीच्या मतांचं काही वाटत नाही, याची खंत वाटत असल्याचे ते म्हणाले. मग शरद पवार खरंच पुरोगामी आहेत का? असा प्रश्न आम्हाला पडतो, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात इम्पेरिकल डेटा गोळा केला नसल्याचे हाके म्हणाले. 

फक्त जरांगेवर का बोलता?

मी संविधानाच्या बाजूने बोलतो. संविधानाची शपथ घेऊन मंत्रिपदावर गेलेल्यांची जबाबदारी आहे. आम्हाला सामाजिक न्यायासह समता निर्माण करायची आहे. बेकायदा मागण्या करायच्या, सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला कुणबी समजणं म्हणजे सामाजिक मुर्खपणा असेदेखील म्हटले गेले असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. संदिपान भुमरेंनी वेळोवेळी जाऊन अनेकदा जरांगेंना महत्व दिलंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या पदावर असलेल्या नेत्यांनी ओबीसींच्या हिताच्या बाजुने ठाम भूमिका घेतली नाही. जो समाज सरासरी लाईनच्या मागे आहे. त्या लोकांचे प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आहे, असे ते म्हणाले. 

जरांगे लढले असते तर...

जरांगे लढले असते तर त्यांच्या मागे किती ताकद आहे ते कळले असते. त्यांच्या मागे किती मराठे आहे ते कळले असते, असे लक्ष्मण हाके म्हणाले. लोकसभेत जरांगे फॅक्टर चालला. पण भाजप नको हे नेरेटिव्ह दलित आणि मुस्लिमांमध्ये पसरले. एका जातीला आरक्षण मिळत नसतं. महाराष्ट्रात पाणी, बेरोजगार, आयटी असे अनेक प्रश्न आहेत. ओबीसींमुळे आपल्यावर ही वेळ आल्याचे जरांगेंना वाटते. आज निवडणुकीतून माघार घेतली. उद्या आंदोलनातून माघार घेतील. भविष्यात जरांगे इतिहासजमा झालेले असतील, असे लक्ष्मण हाके म्हणाले. महाराष्ट्राच्या महत्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होतंय आणि जरांगेंकडे सर्वांचे लक्ष लागते, हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. 

एखाद्या समुहाचा प्रतिनिधीच सभागृहात येणार नसेल तर त्यांचा आवाज समोर कसा येणार? नाभिक, धनगर यांचे एकही खासदार निवडून गेले नाहीत. जरांगे यांनी शरद पवार यांच्या स्क्रिप्टनुसार आंदोलन केलंय. आंदोलन कधीच संपल होतं पण पवारांनी त्यांना पुन्हा आणून बसवलंय, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातला ओबीसी लोकसभेसारखी चूक पुन्हा करणार नाही. जिथे जरांगे सभा घेतील तिथे मी जाहीर सभा घेणार असे ते म्हणाले.

लाडकी बहिणसाठी साडे सतरा हजार कोटींचे बजेट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे, एकाही जिल्ह्यात ओबीसीच्या मुलांसाठी वसतीगृहात नाही. अर्ध्याहून लोकसंख्या असलेल्या ओबीसी व्हीजेएनटीसाठी बजेटमध्ये 1 टक्केही तरतूज देण्यात आली नाही.