लॉरेन्स बिश्नोईची क्राईम स्टोरी; वकिली शिकणारा विद्यार्थी तुरुंगात जाऊन बनला मोठा गॅंगस्टर

तिहारपासून कॅनडापर्यंत 6 देशात 700 शूटर. विद्यार्थी ते मोठ गँगस्टर... लॉरेन्स बिश्नोईची क्राईम कुंडली धडकी भरवणारी आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 13, 2024, 06:36 PM IST
लॉरेन्स बिश्नोईची क्राईम स्टोरी; वकिली शिकणारा विद्यार्थी तुरुंगात जाऊन बनला मोठा गॅंगस्टर   title=

Lawrence Bishnoi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात मोठा खुलासा समोर आलाय.  लॉरेन्स गँगनं बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती सूत्रानं दिलीय. बाबा सिद्दीकी हत्येची जबाबदारी घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावरून शुबू लोणकर या आयडीने व्हायरल झालीय. हा शुबू लोणकर हा लॉरेन्सचा जवळचा मित्र शुभम रामेश्वर लोणकरच आहे का? याचा शोध तपास यंत्राणा घेत आहेत. या सर्व प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोण आहे लॉरेन्स बिश्नोई? कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी कसा बनला मोठा गॅंगस्टर?  जाणून घेऊया. 

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई? 

लॉरेन्स बिश्नोईच्या 700 गुंडांच्या टोळीचं नेटवर्क संपूर्ण देशभरात पसरल आहे. विशेष म्हणजे तिहारपासून कॅनडापर्यंत लॉरेन्स बिश्नोईचे शार्प शूटर असल्याचंही सांगण्यात येतंय. 2018 मध्ये रेडी सिनेमाच्या शूटिंगवेळी लॉरेन्सनं सलमानवर हल्ला करण्याचा प्लॅनही आखला होता. मात्र त्याला त्याच्या आवडीचं हत्यार मिळू शकलं नाही.  बिश्नोई हा पंजाबमधला गुंड आहे. त्याच्यावर हत्या आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुसेवालाच्या हत्येनंतर बिश्नोई अधिक चर्चेत आला. ब्रारनं हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्याची योजना बिश्नोईबरोबर तुरुंगात आखली होती, असं ब्रारनं तपासादरम्यान स्पष्ट केलं होतं.

लॉरेन्स बिश्नोई कसा बनला मोठा गॅंगस्टर?   

12 फेब्रुवारी 1993 रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथील एका गावात लॉरेन्स बिश्नोई याचा जन्म  झाला. लॉरेन्सचे वडील हरियाणा पोलिसात शिपाई म्हणूम काम करत होते. मात्र, लॉरेन्सच्या जन्मानंतर चार वर्षांनी म्हणजे 1997 मध्ये त्यांनी पोलिस दलातील नोकरी सोडून शेती सुरू केली. लॉरेन्सने अबोहर जिल्ह्यातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर 2011 मध्ये त्याच्या वडिलांनी चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळवून दिला. कॉलेजमध्ये लॉरेन्सला राजकारणात रस निर्माण झाला. लॉरेन्स पंजाब युनिव्हर्सिटी कॅम्पस स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सहभागी झाला. कॉलेजमध्ये शिकत असताना लॉरेन्स बिश्नोई याची पंजाब विद्यापीठात शिकणाऱ्या गोल्डी ब्रार नावाच्या गुंडाशी भेट झाली. विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणात दोघेही  एकत्र आले. इथचं इतर गटांशी भांडण झाले. कॉलजेमध्ये झालेल्या गँगवारनंतर लाँरेन्सने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. गँगस्टर होण्याआधी लॉरेन्स बिश्नोईने एलएलबीचे शिक्षण घेतले.  प्राणघातक हल्ला, खुनाचा प्रयत्न, दरोडा यासह अनेक गुन्हे त्याच्या दाखल आहेत.

तुरुंगात जाऊन बनला गँगस्टर

विविध गुन्ह्याखाली लॉरेन्स बिश्नोईला अटक झाली.  तुरुंगात जाऊन लॉरेन्स मोठा गँगस्टर बनला. गुरुंगातच त्याची अनेक बड्या गँगस्टरसोबत ओळख झाली.  अनेक बड्या गुन्हेगारी टोळ्यांशी हातमिळवणी करून त्याने आपल्या टोळीचा विस्तार केला. तो अनेक शस्त्र विक्रेत्यांच्या संपर्कात आला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, त्याने मुक्तसर सरकारी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या विजेत्या आणि लुधियाना महानगरपालिका निवडणुकीतील त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या केली. 2014 मध्ये राजस्थान पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्याला पुन्हा अटक करण्यात आली. 2021 मध्ये तिहार जेलमध्ये असताना त्याची गँगस्टरमधून राजकारणी झालेल्या जसविंदर सिंग उर्फ ​​रॉकीशी मैत्री झाली.

2016 मध्ये जयपाल भुल्लरने रॉकीची हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोईने बदला घेतला आणि 2020 मध्ये जयपाल भुल्लरची हत्या केली. 2021 मध्ये, लॉरेन्स बिश्नोई यांना MCOCA अंतर्गत दाखल झालेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी भरतपूरहून दिल्लीतील तिहार तुरुंगात हलवण्यात आले.  यानंतर 29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडात लपून बसलेल्या बिष्णोईसह गोल्डी ब्रारने या हत्येची जबाबदारी घेतली. बित्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये लॉरेन्स टोळीने आणखी एक पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या घरावर गोळीबार केला. गेल्या वर्षी 5 डिसेंबर 2023 रोजी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूर येथील त्यांच्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगने रोहित गोदाराच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोस्ट करून घेतली. या घटनेच्या 10 महिन्यांनंतर, अभिनेता सलमान खानचे जवळचे आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली आहे. यामध्ये देखील लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचे पुरावे समोर येत आहेत.