धोका कायम! मुंबई- पुणे एक्सप्रेस वे पुढील 1-2 तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता

Mumbai Pune Expressway Landslide : इरसालवाडीवर दरड कोसळून एकिकडे अनेकांचा घात केलेला असताना आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये दरडी कोसळण्याचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Jul 24, 2023, 09:29 AM IST
धोका कायम! मुंबई- पुणे एक्सप्रेस वे पुढील 1-2 तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता title=
landslide on Mumbai Pune Expressway creates traffic resoled later no one injured

Mumbai Pune Expressway Landslide : पावसाच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांमध्ये दरडी कोसळल्याचं आपण पाहिलं. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरीही काही तासांसाठी वाहतुकीचा खोळंबा झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनं वाहतुक करणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी. 

मुंबई- पुणे-  एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याची घटना घडली. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास दरड कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यामुळं पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याजवळच दरड कोसळली. परिणामी पुणे- मुंबई मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांचा यावेळी खोळंबा झाला. सुदैवानं दरड कोसळली तेव्हा त्यामध्ये कुठलंही वाहन सापडलेलं नसून आता दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं.

लोणावळ्याजवळील मार्गावर असणारी दरड हटवण्यात आल्याचं यंत्रणांकडून सांगण्यात आलं. असं असलं तरीही सकाळच्या वेळीसुद्धा मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. उर्से टोल नाक्याजवळ अनेक वाहनंही थांबवली जात आहेत. सध्या दरड हटवण्यासाठी यंत्रणां वेगानं प्रयत्न करत असून, काही वेळातच हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. 

परंतु त्या ठिकाणी अद्यापही दरडी पडण्याचा धोका संभवत असल्याने MSRDC ने या संभाव्य दरडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळं वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून पुढील 1-2 तासांसासाठी जुन्या मुंबई पुणे मार्गांवरून वाहतूक चालू करून मुंबई कडे जाणाऱ्या तिन्ही मार्गिका (पूर्ण मार्ग ) बंद करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हेसुद्धा वाचा : आठवड्याची सुरुवातही पावसानं; 'या' चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

वाहतूक सुरळीत 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोळंबलेली वाहतूक आता सुरळीत झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. रविवारी रात्री दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक रात्री 2 वाजेपर्यंत ठप्प झाली होती. आडोशी बोगद्याजवळ जवळपास 25 डंपर भरेल इतका मातीचा ढिगारा रस्त्यावर आला होता. आयआरबी यंत्रणा, बोरघाट पोलीस अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने ढिगारा बाजूला केला गेला. 

रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडताच एक्स्प्रेस वेवरील तिन्ही मार्गिकांवरील वाहतूक ठप्प झाली होती. परिस्थिती पाहता महामार्ग वाहतूक यंत्रणांच्या वतीनं लगेचच मार्गिकांच्या बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरून दोन्ही दिशांनी असणारी वाहतूक आठवड्याच्या शेवटी दुपटीनं वाढल्याचं लक्षात येतं. अशाच वेळी दरडीची घटना घडल्यामुळं इथं बरेच तास वाहनांनच्या रांगा लागल्या. तासनतास वाहनांमध्येच अडकल्यामुळं प्रवाशांना काही अडचणींचाही सामना करावा लागल्याची माहिती समोर आली होती.