Aruna Shanbag Rape Case: कोलकत्ता येथील आरजी कर रुग्णालयात 8-9 ऑगस्टच्या दरम्यान ट्रेनी डॉक्टर महिलेवर अत्यंत अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्याही करण्यात आली. कोलकत्ता प्रकरणानंतर 1973 साली मुंबईत घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेसोबत संबंध जोडला जात आहे. कोलकाता येथे रुग्णालयात ज्या प्रकारे महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला. त्याचप्रकारे जवळपास 51 वर्षांपूर्वी मुंबईतील केएम रुग्णालयात एका नर्ससोबत घडलं होतं. अरुण शानबाग यांच्यावर 27 नोव्हेंबर 1973 साली बलात्कार करुन त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. मात्र, त्या या हल्ल्यातून बचावल्या खऱ्या पण 42 वर्षे अंथरुणाला खिळून राहिल्या.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी पश्चिम बंगाल, बिहार आणि हैदराबादमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर लक्ष वेधले. यावेळी त्यांनी 1973 साली अरुणा शानबाग यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या दुर्दैवी घटनेचाही उल्लेख केला. शानबाग यांच्यावर झालेला लैंगिक अत्याचार हा कामाच्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचार्यांवर होणार्या हिंसाचाराच्या सर्वांत भीषण घटनांपैकी एक आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. काय आहे नेमकं हे प्रकरण जाणून घेऊया.
नोव्हेंबर 1973 मध्ये मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयातील परिचारिका अरुण शानबाग यांच्यावर त्याच रुग्णालयातील वॉर्डबॉयने बलात्कार केला. 27 नोव्हेंबर 1973 साली ही दुर्देवी घटना घडली होती. अरुणा यांचे लग्न ठरलं होतं. केईएममधीलच एका डॉक्टरसोबत त्यांचे लग्न होणार होते. मात्र, त्या आधीच त्यांच्यावर हा भयानक प्रसंग ओढावला.
अरुणा शानबाग यांना आरोपी सोहनलाल यांच्याविषयी काही धक्कादायक माहिती समजली होती. सोहनलाल रुग्णालयात कुत्र्यांसाठी असलेले अन्न चोरत असल्याची माहिती मिळाली. त्याबाबत त्या रुग्णालयात चौकशीदेखील करणार होत्या. त्याचाच बदला घेण्यासाठी सोहनलालने हे कृत्य केलं. 27 नोव्हेंबर रोजी रुग्णालयातील तळघरात कपडे बदलण्यासाठी गेल्या असताना तिथेच दबा धरुन बसलेल्या सोहनलालने त्यांच्यावर बलात्कार केला. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने हल्ला करत कुत्र्यांना बांधायच्या साखळीने त्यांचा गळा आवळला. आरोपी सोहनलालला सुरुवातीला वाटले त्यांचा मृत्यू झाला त्यामुळं त्यांना तिथेच टाकून त्याने पळ काढला.
11 तास रक्ताच्या थारोळ्यात अरुणा शानबाग पडून होत्या. गळा आवळल्यामुळं त्यांच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला. त्यामुळं मेंदुला रक्तपुरवठा करणाऱ्या पेशींनाही दुखापत झाली. त्याचाच परिणाम म्हणून त्यांना ऐकू येणे आणि दिसणे बंद झाले. त्या पर्सिस्ंटट व्हेजिटेटिव्ह स्टेट (पीव्हीएस) मध्ये गेल्या.
अरुणा यांच्यावर हल्ल्यानंतर त्यांचे लग्न तुटले, त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांची साथ सोडली. मात्र केईएमच्या परिचारिका आणि डॉक्टरांनी त्यांची न थकता काळजी घेतली. या प्राणघातक हल्ल्यानंतर 42 वर्षे त्या केईएम रुग्णालयाच्या तळमजल्यावरील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये राहिल्या. रुग्णालयातील परिचारिका त्यांना अंघोळ घालून देणे, खाऊ घालणे. त्यांच्याकडे सतत लक्ष देणे, त्यांनी सुरूच ठेवले.
2011 मध्ये अरुणा शानबाग यांच्या इच्छामरणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मात्र अरुणा यांची अनेक वर्षांपासून काळजी घेणाऱ्या परिचारिकांनी या याचिकेला विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने 2011मध्ये इच्छामरणाची याचिका फेटाळण्यात आली. मात्र, 2015 साली अरुणा शानबाग यांचे न्युमोनियाने निधन झाले. 42 वर्षांच्या वेदनादायी प्रवासाचा अंत झाला. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.